दिल्ली कॅपिटल्सचा दमदार विजय! मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून मात
इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवीच्या निर्णायक अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सहज धुव्वा उडवून आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळविला. मुंबई इंडियन्सला विजयाची लय राखता आली नाही. दिल्लीने त्यांना 6 फलंदाज आणि 11 चेंडू राखून नमविले. सामनावीराची माळ अर्थातच रिझवीच्या गळ्यात पडली.
अरुण जेटली मैदानावर झालेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत 6 बाद 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 163 धावांचे लक्ष्य 18.1 षटकांत 4 गडी गमावत सहज गाठले. दिल्लीकडून इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवीने शानदार अर्धशतक झळकवले. त्याने 51 चेंडूंत 7 षटकार व 7 चौकारांसह 90 धावांची तुफानी खेळी केली. ही त्याची हंगामातील सलग दुसरी अर्धशतकी खेळी ठरली. त्याच्यासोबत पथूम निस्संका (44) आणि डेव्हिड मिलर (नाबाद 21) यांनी मोलाचे योगदान दिले. मुंबईकडून दीपक चहर, रॉबिन बोश आणि मिचेल सॅण्टनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, तर नितीश राणाला जसप्रीत बुमराने स्वतःच्या गोलंदाजीवर धावबाद केले.
यापूर्वी, मुंबईसाठी कार्यवाह कर्णधार सूर्यकुमार यादवने 36 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच रोहित शर्मा (35), नमन धीर (28) आणि मिचेल सॅण्टनर (नाबाद 18) यांनीही फलंदाजीत योगदान दिले. मात्र, तरीही मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, लुंगी एन्गिडी, विप्राज निगम आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हार्दिक पांड्या अनफिट
मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पंडय़ा या सामन्यात खेळला नाही. नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादवने सांगितले की, हार्दिक पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याने आज संघाचे नेतृत्व केले.
Comments are closed.