पादचारी महिलांचा विनयभंग करणाऱ्या माथेफिरू तरुणास अटक
रस्त्याने उलट दिशेने दुचाकीवरून येऊन पादचारी महिलांचा विनयभंग करून पळणाऱ्या एका लिंगपिसाट माथेफिरू तरुणाला बांगूरनगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. त्याने मालाड व समतानगर परिसरात असे तीन गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 23 वर्षीय तरुणी पायी जात असताना समोरून विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आलेल्या चालकाने तिचा विनयभंग केला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी त्या तरुणीने बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची तत्काळ गंभीर दखल घेत पोलिसांनी विविध पथके बनवून आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच खबऱ्याच्या मदतीने शोध घेतला असता आरोपीची दुचाकी आरे कॉलनी परिसरात आढळून आली. त्यामुळे आरोपी तेथे येईल म्हणून पोलिसांनी तेथे दोन दिवस सापळा लावून ठेवला. अखेर तो लिंगपिसाट तरुण तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. मुख्तार नासिर खान (25) असे त्या तरुणाचे नाव असून तो मयुरनगर झोपडपट्टी परिसरात राहतो. त्याने बांगूरनगर व समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारे पादचारी महिलांचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
Comments are closed.