अमित शहांच्या सुरक्षेतील त्रुटी उघड

बंगालमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह चार पोलीस अधिकारी निलंबित : निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई

वृत्तसंस्था/ कोलकाता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पश्चिम बंगालमधील दौऱ्यामध्ये त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सुरक्षेतील या त्रुटीप्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत. एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह कोलकाता पोलीस दलातील चौघांवर कारवाई केली आहे. तसेच एका जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्याजवळ 1 एप्रिल रोजी निर्माण झालेल्या तणावाप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी ही कठोर कारवाई केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाहनांचा ताफा दक्षिण कोलकातामधील अलिपूर सर्वे हाऊसच्या दिशेने जात असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या. याप्रकरणी निवडणूक आयोगाचे सचिव सुजित कुमार मिश्रा यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याचे आणि त्यांच्यावर विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments are closed.