सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार द
बारामती पोटनिवडणूक 2026: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अखेर फोल ठरला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या स्वत: बारामती पोटनिवडणुकीच्या (Baramati Bypoll 2026) रिंगणात उतरल्या आहेत. महायुतीकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरुवातीपासून करण्यात आले होते. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना फोन करुन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवाराचे नाव जाहीर केले. काँग्रेसकडून आकाश मोरे (Akash More) यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यात आले आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज भरतील. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील. मात्र, या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतल्यास सुनेत्रा पवार यांच्यासमोर फारसे आव्हान उरणार नाही. (Maharashtra Politics news)
या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी एक प्रमुख अट ठेवली आहे. त्यांनी म्हटले की, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दाही आहे, या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठीही आम्ही निवडणूक लढवत आहोत. जर राज्य सरकारने अजित पवारांच्या अपघातावर गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ, असे आकाश मोरे यांनी म्हटले. त्यामुळे आता महायुती सरकार काँग्रेसची ही अट मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. सध्याच्या घडीला बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, धनगर आणि ओबीसी मतांच्या बेरीज-वजाबाकीवर समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार हे बारामतीमध्ये कायम मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे. त्यामुळे बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार प्रयत्नशील आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.