सलग तीन पराभवानंतर सीएसकेसाठी दिलासादायक बातमी; पुढचा सामना कधी?
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग तीन सामने गमावल्यामुळे पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या या संघाला गुणतालिकेत अद्याप खातेही उघडता आलेले नाही. मागील काही हंगामांप्रमाणेच यंदाही संघाची सुरुवात कमकुवत झाली असून चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, या कठीण परिस्थितीत संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, पण तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. नुकत्याच झालेल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडूनही हार सहन करावी लागली. आता पुढील सामना खेळण्यासाठी संघाला जवळपास सहा दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. या कालावधीत खेळाडूंना विश्रांतीसोबतच तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, संघासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आक्रमक फलंदाज डेवाल्ड ब्रेविसच्या पुनरागमनाची शक्यता. साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे ब्रेविसला अद्याप एकही सामना खेळता आलेला नाही. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पुढील सामन्यात तो मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ब्रेविस सध्या संघासोबत असून तो सरावात सक्रिय दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना 11 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी ब्रेविस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने संघ व्यवस्थापन आशावादी आहे. ब्रेविसच्या आगमनामुळे संघाची फलंदाजी अधिक मजबूत होऊ शकते.
विशेष म्हणजे, आयपीएल 2025 दरम्यान ब्रेविस रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून संघात दाखल झाला होता. त्या हंगामात संघाची कामगिरी जरी निराशाजनक झाली असली, तरी ब्रेविसने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सहा डावांत 225 धावा करत सुमारे 180 च्या स्ट्राईक रेटने खेळ केला होता. याच कामगिरीच्या जोरावर संघाने त्याला 2026 साठी कायम ठेवले.
आता ब्रेविसची संभाव्य पुनरागमन ही चेन्नईसाठी मोठी सकारात्मक बाब ठरू शकते. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे संघाला विजयाच्या मार्गावर परत येण्याची आशा निर्माण झाली आहे.
Comments are closed.