Nanded News – नांदेडात टोळीयुद्धाचा भडका; 48 तासांत पाच खुनांनी शहर हादरले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
संपूर्ण शहर साखरझोपेत असताना गेल्या 48 तासांत नांदेडमध्ये रक्ताचा सडा पडला असून टोळीयुद्ध आणि वैयक्तिक वादातून झालेल्या पाच हत्येच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. वर्चस्वाच्या लढाईतून ‘साईलाला’ आणि ‘सदा’ गँगमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने हिंसक वळण घेतले असून, थेट शासकीय रुग्णालयात घुसून झालेल्या हत्येच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस प्रशासनासमोर गुन्हेगारांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
हिंसेचा हा थरार 4 एप्रिलच्या मध्यरात्री सुरू झाला. चित्रपट बघून बाहेर पडलेल्या अरजितसिंग चव्हाण याची टोळी युद्धाच्या वर्चस्वातून हत्या करण्यात आली. या घटनेचा सूड घेण्यासाठी चव्हाण याच्या नातेवाईकांनी थेट शासकीय रुग्णालय गाठले आणि तेथे उपचारासाठी दाखल असलेल्या सय्यद आवेज व महंमद आरबाज या दोघांवर सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. शासकीय रुग्णालयात कडक सुरक्षा असतानाही लोकांच्या देखत झालेला हा प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभेल असा होता. या टोळीयुद्धासोबतच शहरात वैयक्तिक वादातूनही हत्येचे सत्र सुरूच आहे. मुरमुरा गल्ली परिसरात जुन्या भांडणातून तबेलेवाले यांची हत्या झाली, तर आज पहाटे श्रीनगरच्या भरवस्तीत अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याच्यावर पाच ते सहा जणांनी चारचाकीतून येऊन धारदार शस्त्राने हल्ला करत त्याचा खून केला.
विशेष म्हणजे, यातील अनेक आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असून त्यांना हद्दपार करण्यात आले होते. तरीही हे गुन्हेगार शहरात शस्त्रानिशी मुक्तपणे फिरतात कसे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एकेकाळी स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर मोठा वचक असायचा, फरार आरोपींच्या घरांवर आणि हालचालींवर पोलिसांची करडी नजर असायची. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ही जरब कमी झाल्याचे या पाच खुनांवरून दिसून येत आहे.
दुसरीकडे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गेल्या 15 दिवसांत अवैध रेती उपसा, गुटखा आणि चंदन चोरीविरोधात मोठी कारवाई करून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला असला, तरी शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यात मात्र त्यांच्या टीमला अपयश आल्याचे चित्र आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी काही आरोपींना अटक केली असली, तरी भररस्त्यात होणाऱ्या या रक्तरंजित घटनांमुळे नांदेडकरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. शहरातील ‘डीबी’ पथके आणि गुप्तचर यंत्रणा पुन्हा सक्रिय करून गुन्हेगारांवर कडक वचक निर्माण करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
Comments are closed.