IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी खालावली! संजू सॅमसनच्या फ्लॉप फॉर्मवर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सोडलं मौन
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल (IPL) 2026 मधील कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. या सीजनमध्ये चेन्नईच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईची खराब गोलंदाजी आणि संजू सॅमसन-ऋतुराज गायकवाड यांसारख्या खेळाडूंचा फॉर्ममध्ये नसणे हे त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. सॅमसनच्या बॅटमधून आतापर्यंत तीन सामन्यांत धावा आलेल्या नाहीत, एकाही सामन्यात तो दोन अंकी धावसंख्या गाठू शकलेला नाही. दरम्यान, चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Steefan Fleming) यांनी संजूच्या बॅटमधून धावा का येत नाहीत, याचे कारण सांगितले आहे.
आरसीबी vs चेन्नई सामन्यांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, जेव्हा तुम्ही एखाद्या फ्रँचायझीसाठी (या प्रकरणात राजस्थान रॉयल्स) दीर्घकाळ खेळत असता, तेव्हा नवीन संघाच्या वातावरणात जुळवून घ्यायला वेळ लागतो. जरी तो खूप सहज वाटत असला, तरीही जुन्या संघाबद्दलची आपुलकी मनात असते आणि तो सध्या या संघाच्या वातावरणात रुळण्याच्या प्रक्रियेतून जात आहे.” फ्लेमिंग यांनी पुढे सांगितले की, संजू सॅमसन फॉर्ममध्ये येण्यासाठी व्याकुळ आहे.
फ्लेमिंग पुढे म्हणाले की, चेन्नईमध्ये पाच किंवा सहा बदल झाले आहेत. मैदानाबाहेर काही गोष्टींवर काम करणे बाकी आहे जेणेकरून खेळाडूंमधील परस्पर संबंध अधिक घट्ट होतील. पण सॅमसनसाठी चांगली गोष्ट म्हणजे तो संघात खूप चांगल्या प्रकारे मिसळला आहे. प्रशिक्षकांनी पुढे सांगितले की, संजू सॅमसन धावा काढण्यासाठी आणि वरिष्ठ खेळाडूंसोबत योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही वर्ल्ड कपमध्ये त्याच्या कामगिरीत पाहिले आहे की, जेव्हा तो लयीत येतो तेव्हा तो अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे संजूला पिवळ्या जर्सीतील त्याचा प्रवास यशस्वी करण्यासाठी आमच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
संजू सॅमसनबद्दल (Sanju Samson) बोलायचे झाले तर, तो गेल्या तीन सामन्यांत दोन अंकी धावसंख्याही गाठू शकलेला नाही. या आयपीएलमध्ये त्याची आतापर्यंतची धावसंख्या 6, 7, 9 अशी राहिली आहे. एकूणच त्याच्या बॅटमधून 3 डावात केवळ 22 धावा आल्या आहेत. चेन्नईला जर विजयाच्या पटरीवर परतायचे असेल, तर सॅमसन फॉर्ममध्ये येणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच चेन्नईला आता आपल्या गोलंदाजी डिपार्टमेंटमध्येही सुधारणा करण्याची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना आता 11 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होईल.
Comments are closed.