Photo – भक्ती आणि प्रेमाचा सुरेल संगम; गौतमी पाटीलच्या नृत्यातून उलगडली ‘कृष्ण सावळा रे’ गाण्याची जादू
श्रीकृष्णाचे लोभसवाणे रूप आणि त्याच्या प्रेमात बुडालेल्या राधिकेच्या भावनांचा एक अनोखा अविष्कार ‘कृष्ण सावळा रे’ या नवीन गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या गाण्यातून भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा एक सुंदर त्रिवेणी संगम पाहायला मिळत असून या गाण्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आहे. आपल्या अदाकारीने आणि लयबद्ध नृत्याने तिने राधिकेची विरक्ती आणि ओढ अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर साकारली आहे.
गौतमीच्या प्रत्येक हालचालीतून कृष्णाप्रती असलेले प्रेम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. या नृत्याला सिनेनृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी दिशा दिली असून, छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांनी या गाण्याचे नेटके दिग्दर्शन केले आहे.

गाण्यातील शब्दरचना अवंतिका बहिरट यांची असून, त्याला युवा संगीतकार आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच सोनाली सोनावणे आणि आदित्य पाटेकर यांच्या मधुर आवाजाने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्रीय संस्कृतीचा साज हे या गाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि भव्य सेटमुळे गाण्याचे सादरीकरण अधिकच उठावदार झाले आहे.

एकूणच, भक्ती आणि प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघालेले ‘कृष्ण सावळा रे’ हे गाणे सध्या सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाले आहे.
Comments are closed.