संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन भग्नावस्थेत; छताला तडे, पाण्याची गळती, भिंतींना बुरशी, कुबट उग्र दर्प, कबुतरांचा ताबा… सारेच भीषण
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धगधगत्या इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन’ उभारण्यात आले आहे. पण चार वर्षे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत या दालनाची अक्षम्य हेळसांड झाली. नगरविकास विभागाच्या इशाराऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने दालनाची भग्नावस्था करून ठेवली. ठिकठिकाणी पाण्याची गळती, भिंतीना बुरशी, कुबट उग्र दर्प, तुटलेले सिलिंग, अस्वच्छता, कबुतरांचा वावर यामुळे या संपूर्ण दालनाची रयाच गेली आहे. महाराष्ट्र दिन अवघ्या काही दिवसांवर असतानाच शिवसैनिकांनी आज धडक देत दालनात ठिय्या दिला आणि प्रशासनाला फैलावर घेतले.
मुंबई महानगर पालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासमोर संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 30 एप्रिल 2010 रोजी या दालनाचे उदघाटन झाले होते. तेव्हापासून दालनाची व्यवस्थित देखभाल होत होती. दररोज असंख्य विद्यार्थी आणि पर्यटक दालनाला भेट देत होते. पण 2022पासून मुंबई महापालिकेवर प्रसासकीय राजवट सुरू झाली आणि दालनाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होण्यास सुरुवात झाली.
n दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आहे. भाषावर प्रांतरचेनवर डॉ. आंबेडकर यांनी ‘दार आयोगाला’ सादर केलेल्या अभिप्रायाची माहिती आणि त्या शेजारी डॉ. आंबेडकर यांचे तैलचित्र आहे. या तैलचित्राच्या वरील फॉल सिंलिंग तुटले आहे. त्याच्या आसपास बुरशी आहे. हे दृश्य पाहून शिवसैनिक संतप्त झाले. आता 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती आहे. काय अवस्था करून ठेवली आहे, याची अशा शब्दांत शिवसैनिकांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.
दुर्मिळ ठेवा पुसला जाण्याची भीती
संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या देदीप्यमान लढय़ाची घोर विटंबनाच सुरू आहे. दालनाच्या दर्शनी भागातील पुतळ्यांपासून अगदी तळघरापर्यंत भीषण अवस्था आहे. दालनातील फॉल सिलिंग पूर्णपणे तुटलेले आहे. भिंतींना ओल आली आहे. त्यावर बुरशी धरली आहे. भिंतींचे रंग उडाले आहेत. दालनात प्रवेश केल्यावर कुबट उग्र दुर्गंधी येते. कबुतरांचा संचार आहे. अनेक ठिकाणी प्लास्टर कोसळले आहे. भिंतीचे पोफडे निघाले आहेत. स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ आहे. दालनात अनेक दुर्मिळ पह्टो आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आहे. चळवळीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण दालनातील दुर्मिळ पह्टो, चळवळीचा इतिहास आणि माहिती असलेल्या पोस्टर्सचा ठेवा धोक्यात आहे.
फक्त कंत्राटदारांचे खिसे भरले का?
प्रवेशद्वाराच्या वरील सिलिंग तुटले आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दालनात प्रवेश करताच त्यांचे लक्ष त्याकडे गेले आणि त्यांचा संताप अनावर झाला. ठेवी मोडून पालिकेने कशावर निधी खर्च केला? रस्ते धुण्यासाठी? रस्त्यांची रंगरंगोटी करण्यासाठी की कंत्राटदारांचे खिसे भरायला? चार वर्षे महापालिकेचा कारभार पालिका प्रशासनाकडे होता या काळात दालनाची अवस्था काय करून ठेवली आहे, असा संतप्त सवाल पेडणेकर यांनी केला.
Comments are closed.