7 परदेशी नागरिकांना 30 दिवसांची कोठडी
6 युक्रेनियन, 1 अमेरिकन नागरिकाचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनआयए) म्यानमारमधून कार्यरत असलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एनआयए न्यायालयाने 6 युक्रेनियन आणि 1 अमेरिकन अशा एकंदर सात परदेशी नागरिकांना 30 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे सर्व व्हिसावर भारतात आले होते, परंतु नंतर मिझोराममार्गे म्यानमारमध्ये गेले आणि त्यांनी वांशिक सशस्त्र गटांशी संपर्क साधला. एनआयएच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तींनी म्यानमारमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तेथील सक्रिय गटांना प्रशिक्षण दिले. हे गट भारतातील दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
दहशतवादी नेटवर्क प्रकरणात एका अमेरिकन आणि सहा युक्रेनियनांसह सात परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला अमेरिकन नागरिकाला कोलकाता विमानतळावर इमिग्रेशन ब्युरोने ताब्यात घेतले. त्यानंतर लखनौ आणि दिल्ली विमानतळांवर तीन युक्रेनियन नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले होते. तपास यंत्रणांच्या मते, अंदाजे 14 युक्रेनियन नागरिक वेगवेगळ्या तारखांना पर्यटक व्हिसावर भारतात दाखल झाल्यामुळे या नेटवर्कच्या व्याप्तीबद्दल चिंता वाढली आहे. हे परदेशी नागरिक प्रथम गुवाहाटीला आले आणि नंतर मिझोरमला गेले. त्यानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून म्यानमारमध्ये प्रवेश केला. हे परदेशी नागरिक म्यानमारमधील वांशिक सशस्त्र गटांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
Comments are closed.