टाकीचा ‘रंग’ बदलला, पण जनतेची ‘तहान’ भागेना ! मोखाड्यातील साखरे-गोदे खुर्द गावात जलजीवन योजनेचे बारा वाजले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्ची पडल्यानंतरही ग्रामीण भागातील जनतेचा घसा कोरडाच राहिला आहे. मोखाडा तालुक्यातील साखरे-गोदे खुर्द गावात उभारलेल्या पाण्याच्या टाकीला दोन वर्षांपूर्वी लावलेला ‘रंग’ फिका होऊन त्यावर पुन्हा दुसरा रंग फासण्यात आला. प्रशासनाने रंग बदलला तरी या योजनेचे थेंबभर पाणीही गावकऱ्यांना मिळालेले नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा या टाकीखालीच ‘स्नान’ आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

मोखाडा तालुक्यातील साखरे-गोदे खुर्द गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत २०२१ मध्ये टाकीचे काम सुरू झाले. नियमानुसार २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होऊन लोकांच्या घरात नळाने पाणी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र २०२६ उजाडले तरी केवळ पाण्याची टाकी बांधून आणि तिला रंगरंगोटी करून प्रशासनाने आपले हात झटकले आहेत. टाकीत पाणी असूनही गावात पाइपलाइन न टाकल्याने गावकऱ्यांना पाण्याचा एक थेंबही मिळेनासा झाला आहे.

ठेकेदार, अधिकाऱ्यांचे संगनमत

या प्रकल्पाचा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच ही पाण्याची योजना रखडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या टाकीचे काम पूर्ण झाल्याचे भासवून त्याची बिलेही काढली गेल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने केवळ रंगरंगोटी करून योजना पूर्ण झाल्याचा देखावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात महिलांना घोटभर पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत असल्याचा संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी व्यक्त केला.

टाकीला चकाचक रंग दिला आहे, टाकीत पाणीही आहे, पण ते लोकांच्या नळाला कधी येणार? सरकारने लाडकी बहीण योजनेवर पैसे खर्च केले, पण त्याच बहिणींना आजही पाण्यासाठी एक-दीड किलोमीटर पायपीट करावी लागत आहे, याची सरकारला लाज वाटली पाहिजे.
– अॅड. ओमकार पाटील, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Comments are closed.