काँग्रेसनंतर आता संजय राऊतांनीही पार्थ पवारांना सुनावलं; पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीचा दाखला देत
पार्थ पवारांवर संजय राऊत : बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करूनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले. यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “राजकारणात महत्त्वाच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यासाठी एक विशिष्ट परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे मी आत्ता सांगू शकत नाही,” असे ते म्हणाले. तसेच, “काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्याचे काही कारण नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा ठेवणेही योग्य नाही,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केले आहे. पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे. काँग्रेससोबतच त्यांनी त्यांचे पुढचे राजकारण केले आहे. शरद पवार म्हणताय की, काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ती जागा कौटुंबिक कारणामुळे लढत नाहीये. याचा अर्थ ती जागा दुसरी कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. लोकशाहीमध्ये जर कोणी निवडणूक लढत असेल तर त्याला विरोध कशाला करावा? लढू नको म्हणत दबाव कशाकरता आणायचा? पार्थ पवार यांचे वडील अजितदादांनी देखील लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडची निवडणूक लढली होती. काँग्रेसच्या मदतीने ते निवडणूक लढले होते. हा अलीकडचाच इतिहास आहे, असे म्हणत त्यांनी पार्थ पवारांवर निशाणा साधला.
Sanjay Raut on Rahuri By Election: विखे पाटील, रवींद्र चव्हाण किती मोठे क्रांतिकारक आहेत?
राहुरीत प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असणार होते. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, समजावून कोणीही सांगत नाही. धमक्या दिल्या जातात. साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार याबाबत कोणी समजावून वगैरे सांगत नाही. समजावून सांगायचं असं कुठलं मोठं क्रांतिकारक काम आहे? समजावून सांगायला विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण गेले, ते किती मोठे क्रांतिकारक आहेत? स्वातंत्र्य चळवळीतील सेनानी आहेत का? तनपुरे देखील महान सामाजिक कार्यकर्ते आहेत का? राधाकृष्ण विखे पाटलांवर किती आरोप आहेत. अलीकडेच त्यांचे जमिनीचे प्रकरण आलेले आहे.
Sanjay Raut: भाजपच्या दहशतीला घाबरत नाही
रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत आणि हे काय समजावून सांगणार? हे धमक्या द्यायला जातात. हे फाईल घेऊन जातात. माघार घ्या, लढू नका नाहीतर कारखान्याला नोटीस मारू. जे या धमक्यांना घाबरतात ते मागे जातात. सध्याच्या राजकारणात तुम्हाला लढावे लागते. संघर्ष करावा लागतो नाहीतर तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा. गळ्यात आम्ही भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं. पण आम्हाला हे मान्य नाही. आम्ही भाजपला घाबरत नाही. भाजपच्या दहशतीला घाबरत नाही. या देशात लोकशाही आहे. या देशात ट्रम्पशाही सुरू नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
Sanjay Raut on Baramati By Election: काँग्रेस हा महाविकास आघाडीतील स्वतंत्र पक्ष
सुनेत्रा पवार यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला वाटत नाही की त्यांना महाविकास आघाडीतून कोणी पाठिंबा दिलेला आहे. आमच्या त्यांच्या कुटुंबाविषयी सद्भावना आहेत. शरद पवारांनी कौटुंबिक कारणाने बारामतीत आपला उमेदवार दिलेला नाही. उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्यावर त्यांनी देखील सद्भावना व्यक्त केल्या. पण, काँग्रेस हा महाविकास आघाडीतील स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची भूमिका लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे. उमेदवार देताना त्यांनी एक अट टाकली आहे की, उमेदवार मागे घेण्याची तुमची विनंती आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भात गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा, असे त्यांनी म्हटले. तर बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळी शिवाय चालेल. बारामतीचे मतदार शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करतील, असे देखील संजय राऊत म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.