Shopping: ‘या’ देशातील महिला करतात सर्वाधिक शॉपिंग
‘शॉपिंग’ हा शब्द ऐकला की अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. विशेषतः महिलांसाठी खरेदी ही केवळ गरज नसून आनंद, स्वतःसाठी वेळ आणि तणाव कमी करण्याचा एक मार्ग असतो. कपडे, दागिने किंवा घरगुती वस्तू असोत, शॉपिंग ही जीवनशैलीचा एक भाग बनली आहे. पण जगभरात पाहिलं तर काही देशांतील महिला खरेदीच्या बाबतीत इतरांपेक्षा खूप पुढे आहेत.
अलीकडील जागतिक सर्वेक्षणांनुसार, काही देशांमध्ये महिलांची खरेदी करण्याची सवय खूपच जास्त आहे. ऑफलाईन मॉल्सपासून ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मपर्यंत या देशांमधील महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसतात. विशेषतः अमेरिका, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या देशांतील महिलांचा यात मोठा सहभाग आहे.
या देशांमधील महिलांचा कल केवळ जास्त खरेदी करण्याकडेच नाही, तर महागड्या आणि उच्च दर्जाच्या वस्तूंवर खर्च करण्याकडेही आहे. फॅशन आणि ब्रँडेड कपड्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. सरासरी पाहता, या देशांमध्ये महिलांचा कपड्यांवर होणारा वार्षिक खर्च खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्या लक्झरी लाइफस्टाइलमध्ये आघाडीवर आहेत.
कपड्यांच्या संख्येच्या बाबतीत हाँगकाँगमधील महिला सर्वात पुढे असल्याचं काही अहवालांत दिसून येतं. इथे एका वर्षात महिला १०० पेक्षा अधिक नवीन कपडे खरेदी करतात. त्यानंतर नेदरलँडमधील महिलाही मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी करतात.
ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत चीनमधील महिला आघाडीवर आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वस्तू शोधणे, तुलना करणे आणि खरेदी करणे यासाठी त्या मोठा वेळ खर्च करतात. दक्षिण कोरिया आणि तैवानमध्येही ऑनलाईन शॉपिंगचा मोठा ट्रेंड दिसून येतो. अमेरिकेतही ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि कपड्यांच्या बाजारपेठेत तो देश अजूनही अग्रस्थानी आहे.
भारताबद्दल बोलायचं झालं तर, कपड्यांच्या एकूण बाजारपेठेच्या दृष्टीने भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ‘प्रति व्यक्ती’ खरेदीचा विचार केला तर चित्र थोडं वेगळं दिसतं. भारतीय महिला वर्षभरात खूपच कमी प्रमाणात म्हणजे ५ कपडे कपड्यांची खरेदी करतात. बहुतांश वेळा सण, समारंभ किंवा गरजेनुसारच खरेदी केली जाते.
याउलट, अमेरिका आणि चीनमधील महिला वर्षभरात अनेक वेळा खरेदी करतात आणि त्यावर जास्त खर्चही करतात. त्यामुळे जागतिक स्तरावर खरेदीच्या सवयींमध्ये भारत अजूनही संयमित आणि गरजेनुसार खरेदी करणाऱ्या देशांमध्ये गणला जातो.
Comments are closed.