रुग्णसेवेच्या नावाखाली लूट; अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या डॉक्टरला 116 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील अटलांटा येथे राहणारे हिंदुस्थानी वंशाचे डॉक्टर आणि त्यांच्या ‘ॲडवान्स युरोलॉजी’ (Advanced Urology) या संस्थेने आरोग्य सेवा क्षेत्रात फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जितेश पटेल असे या डॉक्टरचे नाव असून त्याच्यावर अनावश्यक वैद्यकीय चाचण्या आणि शस्त्रक्रिया करून सरकारी तिजोरीची लूट केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर $14 दशलक्ष (सुमारे 116 कोटी रुपये) दंड आकारण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) या संदर्भात अधिकृत माहिती दिली असून, ‘फॉल्स क्लेम्स ॲक्ट’च्या उल्लंघनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. पटेल यांच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या जवळपास प्रत्येक नवीन रुग्णावर अनावश्यक आणि त्रासदायक चाचण्या केल्या जात असत. यामध्ये रुग्णांना भूल देऊन त्यांच्या शरीरात दुर्बिणी टाकणे, स्नायू आणि जननेंद्रियांना इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवणे (Electromyography) आणि हजारो अनावश्यक अल्ट्रासाऊंड चाचण्यांचा समावेश होता. अनेक वेळा रुग्णांना फायदा होई ल की नाही हे न तपासताच त्यांच्या शरीरात उपकरणे बसवण्यात आली. या सर्व प्रकारातून केवळ डॉक्टरांचा आर्थिक नफा साधला जात होता.

ॲडवान्स युरोलॉजी या संस्थेचे माजी कर्मचारी लॉरेन पेरुमल-श्रामेल आणि डॉ. हिमांशू अग्रवाल या दोघांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. त्यांनी न्यायालयात धाव घेऊन या गैरप्रकारांची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, ही संस्था केवळ उत्पन्न वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धती वापरत होती. या दोघांनी दिलेल्या माहितीमुळे हे प्रकरण उघडकीस आले. या कामगिरीबद्दल लॉरेन पेरुमल-श्रामेल आणि डॉ. हिमांशू अग्रवाल यांना दंडाच्या रकमेतून सुमारे २.९४ दशलक्ष डॉलर्सचा वाटा बक्षीस म्हणून मिळणार आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेऊन न्यायालयाने तातड़ीने तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली. तपास यंत्रणांच्या मते, डॉ. पटेल आणि त्यांच्या संस्थेने ‘अपकोडिंग’चा (Upcoding) आधार घेतला होता. म्हणजे प्रत्यक्षात सोपी शस्त्रक्रिया करून कागदोपत्री मात्र महागड्या शस्त्रक्रियेचे बिल सरकारी योजनांना (Medicare, Medicaid) पाठवले जात असे. काही प्रकरणांमध्ये तर अशा शस्त्रक्रियांची बिले काढली गेली, ज्या प्रत्यक्षात कधी झाल्याच नव्हत्या. यामुळे सरकारी संसाधनांचा गैरवापर झाला असून गरजूंना मिळणाऱ्या निधीवर डल्ला टाकल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एफबीआय (FBI) आणि इतर अनेक सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे. या आरोपांखाली डॉ. जितेश पटेल यांनी 116 कोटी रुपये दंड म्हणून भरण्याचे कबूल केले आहे. डॉ. पटेल यांनी दंड भरून हे प्रकरण मिटवण्याचे मान्य केले असले, तरी त्यांनी अद्याप कोणताही गुन्हा अधिकृतपणे कबूल केलेला नाही. मात्र, रुग्णसेवेपेक्षा पैशाला महत्त्व देणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशारा अमेरिकेच्या न्याय विभागाने दिला आहे.

Comments are closed.