डेरेदार वटवृक्षांच्या कत्तलीविरोधात नाशिककर रस्त्यावर; महापालिका प्रशासनाचा आडमुठेपणा कायम, पर्यावरणप्रेमींची धरपकड
तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. गंगापूर रस्त्यावरील दीडशे वर्षांहून अधिक जुन्या दोन वटवृक्षांवर कुर्हाड चालवली जात आहे, याविरोधात आज संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले. त्यांना न जुमानता प्रशासनाने ही वृक्षतोड सुरूच ठेवली, तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरणारी ही झाडे हटवा, अशी मागणी करीत स्थानिक नागरिक पर्यावरणप्रेमींविरोधात उभे ठाकले होते.
तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे वाचवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आंदोलनाचा वणवा पेटला, महाराष्ट्रभरातून या आंदोलनाला साथ मिळाली होती. राष्ट्रीय हरित लवादाने वृक्षतोडीविरोधात आदेश देवूनही विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरूच आहे. शहरातील दहा ते बारा रस्त्यांवरील झाडांची कत्तल रविवारी उद्यान विभागाकडून सुरू होती. गंगापूर रस्त्यावरील दीडशेहून अधिक वर्ष जुन्या वडाच्या दोन झाडांवरही कुर्हाड चालवली जात आहे, याविरोधात पर्यावरणप्रेमी सोमवारी सकाळपासून रस्त्यावर उतरले. लहान मुलांसह तरुणही यात सहभागी होते. तरुणींनी झाडावर चढून प्रशासनाचा निषेध केला. झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा, नाशिक वाचवा घोषणांनी परिसर दणाणला होता. नाशिकला उद्ध्वस्त करण्याचा घाट घालणार्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आंदोलन सुरू असतानाच वृक्षतोडीसाठी कामगारही दाखल झाले, सलग दुसर्या दिवशी त्यांनी या झाडांच्या फांद्यांवर घाव घातले. प्रशासनाचा हटवादीपणा कायम असल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. या आंदोलनात राजू देसले, तल्हा शेख, भारती जाधव, राजेश पंडित, संदीप भानोसे, अमित कुलकर्णी आदींसह नाशिककर सहभागी होते. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी पावणेबाराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. तब्बल साडेचार तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पर्यावरणप्रेमी व स्थानिक आमनेसामने
गंगापूर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांमुळे सातत्याने अपघात होतात, यात काहींनी प्राण गमावले असल्याने ही झाडे हटवाच, या मागणीसाठी स्थानिक वृक्षतोड समर्थक घटनास्थळी आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. पर्यावरणप्रेमींच्या मागणीला कडाडून विरोध केला. त्यामुळे काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
संविधानिक लढा दाबण्याचा प्रयत्न
संविधानिक पद्धतीने आमचा लढा सुरू आहे, तरीही महापालिका दबाव टाकत आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत आहे, बेकायदा वृक्षतोडीचे समर्थन करत आहे. नाशिक भकास करण्याचे काम जनतेच्याच कराच्या पैशातून सुरू आहे, याचा माकपाचे तल्हा शेख यांनी निषेध केला.
Comments are closed.