डेव्हिड वॉर्नरला मद्यपान करुन गाडी चालवल्यामुळे पोलिसांनी केली अटक, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार?
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या घटनेने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रविवारी संध्याकाळी मारुब्रा येथील मलबार रोडवर रस्त्याच्या कडेला अचानक तपासणी केली असता, ब्रेथ टेस्टमध्ये दोषी आढळल्याने न्यू साउथ वेल्स पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
न्यूज डॉट कॉमच्या वृत्तानुसार, वॉर्नर न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या रस्त्यावरील ब्रेथ टेस्टमध्ये अपयशी ठरला आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेले असता त्याच्या दुसऱ्या ब्रेथ टेस्टमध्ये ०.१०४ इतके रिडिंग आले, जे नियमापेक्षा अधिक आहे. सध्या पोलिसांनी त्याला मुक्त केले आहे.
“आज रविवार (५ एप्रिल, २०२६) सायंकाळी सुमारे ५.३० वाजता पोलिस मारुब्रा येथील मलबार रोडवर
ब्रेथ टेस्ट करत होते. तपासणी स्थळाच्या काही अंतरावर एक व्हॅन थांबून पार्क केल्याचे दिसून आले,
वाहतूक आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी त्या वाहनाजवळ जात वॉर्नरची तपासणी केली असता तो त्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. तेथून त्याला अटक करत मारुब्रा पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि त्याची दुसरी चाचणी केली. त्यानंतर त्याला मध्यम श्रेणी पीसीए (PCA) सह वाहन चालवल्याबद्दल फिल्ड कोर्ट अटेंडन्स नोटीस बजावण्यात आली. त्याला ७ मे, २०२६ ला कोर्टात हजर व्हावे लागणार आहे,” असे पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
वॉर्नर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या हंगामात कराची किंग्जचे नेतृत्व करतो. संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सलग तीन सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. संघाचा पुढील सामना ९ एप्रिलला असून तो कराचीच्या स्टेडियमध्ये पेशावर झाल्मीविरुद्ध आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला परतला होता. आता तो वेळेत पाकिस्तानमध्ये पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वॉर्नरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएल आणि बिग बॅश लीगसह अनेक टी२० लीगमध्ये खेळला आहे, मात्र मागील दोन वर्षांपासून कोणत्याही आयपीएल संघाने त्याला संधी दिली नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या वॉर्नरने २०१६ मध्ये सनरायझर्स हैद्राबादला विजतेपद मिळवून दिले होते. त्याने १८४ आयपीएल सामने खेळले असून त्यात ४०.५२ च्या सरासरीने ६५६५ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये तीनदा ऑरेंज कॅप जिंकण्याची विक्रमी कामगिरीही केली आहे.
Comments are closed.