बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! तमीम इकबाल अचानक अध्यक्ष, अमीनुल इस्लाम बुलबुल यांना हटवले
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश क्रिकेटमध्ये सातत्याने काही बदल होत आहेत. दरम्यान, आता बांगलादेश बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज, ७ एप्रिल रोजी माजी क्रिकेटपटू अमीनुल इस्लाम यांना बीसीबी अध्यक्षपदावरून हटवले. बोर्डाने आता माजी क्रिकेटपटू तमीम इक्बाल याची नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता, बोर्डाच्या अनेक संचालकांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (बीसीबी) अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अमीनुल यांच्यावर मनमानीपणे काम केल्याचा आरोप होता.
रिपोर्ट्सनुसार, अमीनुल इस्लाम बुलबुल यांना आता बीसीबी अध्यक्षपदावरून हटवण्यात आले असून, पुढील अध्यक्षांच्या निवडणुका होईपर्यंत मंडळाचा कारभार पाहण्यासाठी अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेली ११ सदस्यीय समिती मंडळाचा कारभार सांभाळेल आणि या समितीच्या प्रमुखपदी माजी राष्ट्रीय कर्णधार तमीम इक्बाल याची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमीनुल यांच्या कार्यकाळात, बांगलादेश क्रिकेट संघाने भारतात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकातून माघार घेतली होती. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला, जो अमीनुल प्रभावीपणे हाताळू शकले नाहीत. अलीकडेच, बांगलादेश बोर्डाच्या सहापेक्षा जास्त संचालकांनी राजीनामा दिला. याला प्रतिसाद म्हणून, तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आणि पुढील प्रेसिडेंटच्या निवडणुकीची शिफारस केली.
सूत्रांनुसार, बुलबुल यांना पदावरून हटवण्यामागे मुख्य कारण टी-२० विश्वचषकादरम्यानचा वाद होता. त्यावेळी, अंतरिम सरकारचे सल्लागार आसिफ नझरुल यांनी माजी कर्णधारावर मोठा दबाव आणला होता आणि राष्ट्रीय संघाला स्पर्धेसाठी भारतात जाण्यापासून रोखले होते. नवीन समिती स्थापन झाल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डात कोणते बदल घडतील हे पाहणे बाकी आहे.
Comments are closed.