IPL 2026: मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्समध्ये कधी सामील होणार? गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट

आयपीएल 2026 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपल्या मोहिमेची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली आहे. संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांत विजय नोंदवला आहे. दिल्लीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, मिचेल स्टार्कसारखा (Mitchell Starc) दिग्गज गोलंदाज संघात नसतानाही त्यांनी हे दोन्ही विजय मिळवले आहेत. मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने या हंगामासाठी रिटेन केले होते, पण तो अद्याप संघासोबत जोडला गेलेला नाही. दिल्लीची फ्रँचायझी स्टार्कची आतुरतेने वाट पाहत आहे, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याला अद्याप आयपीएलमध्ये खेळण्यासाठी NOC मिळालेले नाही. आता मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी सामील होईल, याबाबत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांनी मोठी अपडेट दिली आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुनाफ पटेल यांनी सांगितले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या दुखापतीबाबत त्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे फ्रँचायझीला सध्या त्याच्या स्थितीबद्दल काहीही माहित नाही. त्यांनी असेही म्हटले की, स्टार्कच्या दुखापतीचा संघावर आतापर्यंत कोणताही परिणाम झालेला नाही, कारण दिल्लीचे विजय सुरू आहेत.

पत्रकार परिषदेत मुनाफ यांनी 36 वर्षांच्या स्टार्कचे संघातील महत्त्व विषद केले आणि त्याची तुलना थेट जसप्रीत बुमराहशी केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही दोन सामने जिंकले आहेत, त्यामुळे सध्या तरी मिचेल स्टार्कची उणीव भासत नाहीये असे वाटते. आम्ही चांगली कामगिरी करत असल्यामुळे कोणीही त्याला मिस करत नाहीये, पण संघात त्याची भूमिका खूप मोठी आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि तो नेहमीच एक मोठा गोलंदाज राहील.

मला वाटत नाही की, आयपीएलमध्ये गोलंदाजीच्या बाबतीत त्याच्यापेक्षा मोठा दुसरा कोणी गोलंदाज आहे. मला वाटते की तुम्ही फक्त जसप्रीत बुमराहचीच त्याच्याशी तुलना करू शकता. मिचेल स्टार्कबद्दल बोलायचे झाले तर, तो आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या तीन संघांसाठी खेळला आहे. या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 49 डावांत 65 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये स्टार्कने आतापर्यंत दोनदा ‘फोर-विकेट हॉल’ आणि एकदा ‘फाइव्ह-विकेट हॉल’ घेण्याचा पराक्रम केला आहे. आयपीएलमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 8.31 चा असून 35 धावांत 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Comments are closed.