इराणला शस्त्रे देणाऱ्या देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणच्या मित्र राष्ट्रांना एक स्पष्ट संदेश दिला आहे. ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट शेअर करत ट्रम्प म्हणाले आहेत की, “जो कोणताही देश इराणला लष्करी शस्त्रे पुरवेल, त्याला अमेरिकेला विकल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवर तात्काळ ५० टक्के टॅरिफ (शुल्क) भरावे लागेल.” ट्रम्प यांनी पुढे लिहिले, “हा नियम तात्काळ लागू होईल. कोणतीही सूट किंवा सवलत दिली जाणार नाही.”
परमाणु मुद्द्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराण आता युरेनियमचे संवर्धन करणार नाही आणि जमिनीखाली असलेले अणु अवशेष शोधून बाहेर काढले जातील. इराणच्या अणुकेंद्रिय ठिकाणांवर सॅटेलाईटद्वारे कडक नजर ठेवली जात असून, तिथे अद्याप कोणत्याही गोष्टीला धक्का लागलेला नाही, असा दावा त्यांनी केला. जर इराणने या सर्व अटी मान्य केल्या, तर अमेरिका त्यांच्यावर लादलेले कठोर निर्बंध शिथिल करेल.
सध्या दोन्ही देशांमध्ये टॅरिफ कपात आणि निर्बंधांमधून सवलत देण्याबाबत चर्चा सुरू आहे. या करारासाठी एकूण १५ मुद्दे निश्चित करण्यात आले असून, त्यातील बहुतांश मुद्द्यांवर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. इराणवरील निर्बंध कसे हटवायचे आणि टॅरिफमध्ये किती कपात करायची, यावर पुढील चर्चा सुरू राहील, असेही ते म्हणाले.
Comments are closed.