हिंदुस्थान के पापा गायब… पाकिस्तान के अब्बा ने वॉर रुकवा दी! अमेरिका बॅकफूटवर; इराणच्या अटींवर युद्धविराम
अवघ्या जगाला ‘गॅस’वर ठेवणारे इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध आज 40 व्या दिवशी थांबले. दोन आठवडय़ांचा युद्धविराम झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी यासाठी मध्यस्थी केली, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. याची सध्या जगभरात चर्चा आहे. अमेरिका, इस्रायलचे दौरे करून ट्रम्प व नेतन्याहू यांच्याशी मैत्री करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या चर्चेत कुठेही नाही. सोशल मीडियात या घडामोडींचे पडसाद उमटले. ‘हिंदुस्थान के पापा गायब… पाकिस्तान के अब्बा ने वॉर रुकवा दी’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया नेटकऱयांनी व्यक्त केली.
इराणकडून होर्मुझ पुन्हा बंद
युद्धबंदी मान्य करताना इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले होते. इराणने आता त्यास आक्षेप घेतला आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने इस्रायलला धमकी दिली आहे. लेबनॉनवर हल्ले केल्यास तेल अवीववर हल्ले केले जातील, असे इराणने ठणकावले. दरम्यान, लेबनॉनवर होत असलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी पुन्हा बंद केली आहे.
सौदी अरेबियातील तेल पाईपलाईवर हल्ला
सौदी अरेबियातील अत्यंत महत्त्वाच्या ईस्ट-वेस्ट तेल पाईपलाईनवर ड्रोन हल्ला झाला आहे. गल्फ आणि लाल समुद्राला जोडणारी ही पाईपलाईन इराण युद्धाच्या काळात जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली होती. दिवसाला 7 दशलक्ष बॅरल तेल पुरवण्याची या पाईपलाईनची क्षमता आहे. आजच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.
ट्रम्प म्हणाले, इराणशी चर्चा बंद दाराआड
इराणशी पुढची चर्चा ‘बंद दाराआड’ पार पडेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युद्धबंदीच्या संदर्भात येणाऱया बातम्या फेक न्यूज आहेत. अनेक लोक विविध करार, याद्या आणि पत्रके प्रसिद्ध करत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटींशी याचा काडीमात्रही संबंध नाही. अमेरिकेला मान्य होतील असे ‘मुद्दे’ वेगळे आहेत. त्यावर बंद दाराआड चर्चा करू, असे ट्रम्प म्हणाले.
इराण आणि अमेरिकेत तुंबळ युद्ध भडकणार असे वाटत असतानाच आज पहाटे युद्धबंदीचे वृत्त आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’ पोस्ट करत ही घोषणा केली. ‘इराण, अमेरिका आणि त्यांच्या सर्व सहकारी देशांनी आखात आणि लेबनॉनसह सर्वच ठिकाणी तत्काळ युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो,’ असे शरीफ यांनी पोस्टमध्ये नमूद केले. पाकिस्तानच्या या यशस्वी शिष्टाईनंतर हिंदुस्थानी सोशल मीडियात मोदी सरकारवर उपरोधिक टीका सुरू झाली आहे.
रशिया-युव्रेनमध्ये युद्ध भडकल्यानंतर तेथील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले होते. त्याबद्दल मोदी समर्थकांनी सोशल मीडियात मोदी सरकारचे गुणगान सुरू केले होते. एक जाहिरातही त्यावेळी गाजली होती. युद्धग्रस्त देशातून परतलेली एक तरुणी समोर वडिलांना पाहून, ‘मोदीजी ने वॉर रुकवा दी पापा’ असे रडत रडत सांगते. त्यावरून सरकारवर टीकाही झाली होती. त्याच जाहिरातीचा आधार घेत आता सोशल मीडियात टीका होत आहे.
शुक्रवारी इस्लामाबादेत चर्चा
इराण-अमेरिकेमध्ये दोन आठवडय़ांची युद्धबंदी झाल्यानंतर आता पुढील चर्चा इस्लामाबादेत होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी त्यासाठी आमंत्रण दिले आहे. सर्व मतभेद चर्चेतून सुटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. इराणनेही चर्चेचे आमंत्रण स्वीकारले आहे.
इराणचा विजयाचा दावा
इराणला संपवण्याची भाषा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अटी मान्य करूनच युद्धबंदी जाहीर केली. इराणच्या अटी विचार करण्यासारख्या आहेत, असे ट्रम्प म्हणाले. त्यामुळे 40 दिवसांचे युद्ध आम्ही जिंकल्याचा दावा इराणने केला. इराणच्या लावन, सिरी रिफायनरीवर हल्ले
युद्धबंदीनंतर काही तासांतच इराणच्या लावन आणि सिरी बेटांवर इस्रायलकडून हल्ले करण्यात आले. या दोन्ही बेटांवर इराणच्या अनेक तेल विहिरी आणि रिफायनरी आहेत. या हल्ल्यानंतर इराणने हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. इराणचे अध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांना पह्न करून या हल्ल्यांबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
यूएईत 17 मिसाईल, 35 ड्रोन आदळले
अमेरिका-इराणमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतरही ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. युद्धबंदीनंतर यूएईमध्ये तब्बल 17 मिसाईल आणि 35 ड्रोन आदळले आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली.
कच्चे तेल स्वस्त
मागच्या महिनाभरात सव्वाशे डॉलरवर गेलेल्या कच्च्या तेलाचे भाव आज धाडकन कोसळले. युद्धबंदीची घोषणा होताच कच्च्या तेलाची किंमत बॅरलमागे 90 डॉलरपर्यंत खाली आली आहे.
शेअर बाजार उसळला
युद्धबंदीची घोषणा होताच शेअर बाजार उसळला. सेन्सेक्स बुधवारी तब्बल 2943 अंकांनी म्हणजेच 3.95 टक्क्यांनी वधारला. या तेजीमुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीमध्ये एका दिवसांत तब्बल 17 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
होर्मुझसाठी जहाजामागे 18 कोटी घेणार!
युद्धबंदीच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी खुली राहणार आहे. मात्र प्रत्येक जहाजाकडून सुमारे 18.5 कोटी रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. इराणचा हा निर्णय चांगला आहे. मात्र ही वसुली संयुक्तपणे करू, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेला इराणच्या 10 अटी
1 हल्ले करणार नाही!
2 होर्मुझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण हवे.
3 युरेनियम संवर्धनाचा अधिकार मान्य करा.
4 सर्व प्राथमिक निर्बंध उठवा.
5 सर्व दुय्यम निर्बंध उठवा.
6 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करा.
7 IAEA च्या नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करा.
8 युद्धामुळे झालेली नुकसानभरपाई द्या.
9 आखातातून अमेरिकन सैन्य परत बोलवा.
10 लेबनॉनसह सर्व आघाडय़ांवरील युद्ध थांबवा.
Comments are closed.