हिंसाचार आणि गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा ‘तृणमूल’ला इशारा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत हिंसाचार किंवा कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट आणि कठोर इशारा केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस पक्षाला दिला आहे. यावेळी निवडणूक पूर्णत: मुक्त, निर्भय आणि न्यायोचित पद्धतीने झाली पाहिजे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश आयोगाने या पक्षाच्या नेत्यांना पोहचविला आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली. या नेत्यांनी त्यांच्याशी वादावादी केली आणि आरडाओरडाही केला, असा आरोप केला जात आहे. या पक्षाने हा आरोप नाकारला आहे. आयुक्तांनी आम्हाला ‘चालते व्हा’ असा आदेश दिल्याचा आरोप या नेत्यांनी केला. यावरुन वादावादी झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या भेटीनंतर ज्ञानेश कुमार यांनी ‘एक्स’वरुन त्यांचा हा इशाऱ्याचा संदेश प्रसिद्ध केला आहे.

‘बूथ जॅमिंग, सोर्स जॅमिंग’ नको

यावेळची विधानसभा निवडणूक नियमबद्ध पद्धतीनेच झाली पाहिजे. मतदार यंत्रांची पळवापळवी, मतदान केंद्रांचा ताबा घेणे, मतदार यंत्रे बंद करणे किंवा जॅम करणे, सोर्स जॅम करणे, मतदान केंद्रांसमोर दंगा करणे, असे आणि यासारखे प्रकार होता कामा नयेत. असे प्रकार केल्यास मतदारांना त्रास होतो. त्यामुळे ते खपवून घेतले जाणार नाहीत. यावेळी निवडणूक भयमुक्त, हिंसाचारमुक्त, धाकधपटशामुक्त आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात झाली पाहिजे, अशी तंबीच त्यांनी दिली आहे.

विरोधी पक्षांची टीका

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या या संदेशावर विरोधी पक्षनेत्यांनी टीका केली आहे. हा संदेश डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला दिलेल्या संदेशाप्रमाणे आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केली आहे. तर याच पक्षाचे साकेत गोखले यांनी ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पक्षाचे दलाल असल्याचा आरोप केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ज्ञानेश कुमार यांना आता या पदावरुन काढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Comments are closed.