चिपळूणमध्ये पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण, सातारा जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चिपळूण शहरातील काविळतळी परिसरातील राहुल गार्डन येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका 29 वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुभम प्रकाश पवार असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात सातारा जिल्ह्यातील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश मार्तंडराव पवार (वय – 70) यांचा मुलगा शुभम आणि आरोपी सौरभ चव्हाण व वैभव साकंडे (दोन्ही रा. काळज, लोणंद, जि. सातारा) यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद होता. बुधवार 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास आरोपींनी शुभम याला फोन करून राहुल गार्डन इमारतीखाली बोलावून घेतले. त्यावेळी प्रकाश पवार हे देखील आपल्या मुलासोबत खाली आले होते. मात्र, आरोपींनी शुभम याला काही समजण्याच्या आतच जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवले आणि तिथून पळवून नेले.

या धक्कादायक प्रकारानंतर पवार यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सौरभ चव्हाण आणि वैभव साकंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून शुभमचा शोध घेतला जात आहे.

Comments are closed.