Jalna News वडिलांना करायचे होते दुसरे लग्न, मुलाने रागच्या भरात कुऱ्हाडीने केले सपासप वार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पोटच्या मुलानेच बापाची कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज ९ एप्रिल रोजी जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रुई गावात सकाळच्या सुमारास दिलीप राजगुरू (४५) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत कुर्‍हाडीने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला. दिलीप राजगुरू यांचा मुलगा विलास राजगुरू (१९) याने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

मृत दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचे निधन झाले होते. ते दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होते आणि संबंधित दिवशीच त्यांचा विवाह होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांच्या या विवाहाच्या निर्णयाचा राग मनात धरून मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, विवाहाच्या दिवशीच दिलीप राजगुरू यांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.