'माझ्याकडे फक्त 3 ते 6 महिने होते'; कॅन्सरच्या लढाईवर युवराज सिंगचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि २००७ चा टी-२० वर्ल्ड कप तसेच २०११ चा वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा महत्त्वाचा भाग राहिलेल्या युवराज सिंहने, कॅन्सरशी दिलेल्या लढाईतील आपला वेदनादायक प्रवास पुन्हा एकदा सांगितला आहे. युवराज सिंहची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठ्या ‘मॅच विनर’ खेळाडूंमध्ये केली जाते. २०११ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याने बॅट आणि बॉल अशा दोन्ही आघाड्यांवर मोलाची कामगिरी करत ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब पटकावला होता. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर चाहत्यांना समजले की युवराज कॅन्सरशी झुंज देत आहे. आता एका पॉडकास्टमध्ये त्याने खुलासा केला आहे की, एका वेळी डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की त्याच्याकडे जगण्यासाठी केवळ ३ ते ६ महिन्यांचा काळ उरला आहे.

​इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याच्यासोबत ‘द ओव्हरलॅप क्रिकेट पॉडकास्ट’वर बोलताना युवराजने या संघर्षाबद्दल सांगितले की, जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर असता आणि अचानक तिथून खाली कोसळता, तेव्हा ते स्वीकारणे खूप कठीण असते. “मी दिल्लीत होतो आणि आम्हाला वेस्ट इंडिज व इंग्लंड दौऱ्यावर जायचे होते. सौरव गांगुली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले होते आणि त्यांची जागा रिकामी झाली होती. मी बऱ्याच काळापासून या संधीची वाट पाहत होतो. मी तेव्हा म्हणालो होतो की, मी मेलो तरी चालेल पण मला ती जागा हवी आहे. मात्र, त्यानंतर माझी प्रकृती सतत खालावत गेली.”

​युवराज सिंहने पुढे सांगितले की, डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, “तुमची ट्यूमर (गाठ) तुमच्या हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या मध्ये आहे. जर तुम्ही अशाच प्रकारे क्रिकेट खेळत राहिलात, तर तुम्हाला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. जर तुम्ही लवकरात लवकर केमोथेरपी घेण्याचा निर्णय घेतला नाही, तर तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त ३ ते ६ महिने उरले आहेत.” तेव्हा मला जाणीव झाली की आता मला यावर गांभीर्याने विचार करावा लागेल.

​डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर युवराजने उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याच्यावर डॉ. आइनहॉर्न यांनी उपचार केले, ज्यांनी प्रख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉन्गवरही उपचार केले होते. कॅन्सरशी लढताना युवराजला सतत एका गोष्टीची भीती वाटत होती की तो पुन्हा कधी क्रिकेट खेळू शकेल की नाही. स्वतःला प्रेरित ठेवणे त्याच्यासाठी खूप कठीण होते. तो म्हणाला, “त्या वेळी मी विचार केला की जर मी क्रिकेट खेळलो नाही, तर माझी ओळख काय?” मात्र, कॅन्सरवर पूर्णपणे मात केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत युवराज फिट झाला आणि त्याने भारतीय संघात पुनरागमन केले, तसेच २०१४ चा टी-२० वर्ल्ड कप देखील खेळला.

Comments are closed.