Baramati Bypoll Election आधी ताणले… अखेर बारामतीतून कॉँग्रेसची माघार

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, कॉँग्रेस ही निवडणूक लढणारच, अशी ठाम भूमिका कॉँग्रेसकडून घेण्यात आली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपासून ते अर्ज माघारीच्या एक दिवस आधीपर्यंत बारामतीत लढणारच, अशी टोकाची भूमिका घेत कॉँग्रेसने ताणून धरले होते. मात्र गुरुवारी सकाळी मुंबई आणि दिल्लीतून झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या पह्नापह्नीनंतर अखेर बारामतीच्या निवडणूक रिंगणातून कॉँग्रेसने माघार घेतली.

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी होत असलेली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी महायुती तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केलेल्या विनंतीमुळे शिवसेनेनेही उमेदवार दिला नव्हता. कॉंग्रेसने मात्र महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका घेत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने देशाचे लक्ष बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे लागले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कॉँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्याने राष्ट्रवादी अजितदादा गटाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

मुंबईत गाठीभेटी

रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केली. तसेच पार्थ पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. अजितदादा गटाच्या शिष्टमंडळाने सपकाळ यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील कॉँग्रेसची उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा केली.

शरद पवार-खरगे चर्चा

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई व दिल्लीतून मोठय़ा राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी पह्नवरून संपर्क साधत बारामतीतून कॉँग्रेसने माघार घेण्याबाबत चर्चा केली.

राहुरीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत

भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपने कर्डिले यांचा मुलगा अक्षय याला उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटीनंतर ऐन वेळी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी राहुरीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.

फडणवीस, सुनेत्रा पवार यांची फोनाफोनी

स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस नेत्यांना फोनवर संपर्क करून उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीत उमेदवार न देण्याबाबत विनंती केली.

फडणवीसांच्या फोनचा निर्णयाशी संबंध नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी फोन केला होता असे सपकाळ यांनी या वेळी मान्य केले, मात्र फडणवीसांच्या फोनचा आणि काँग्रेसच्या माघारीचा संबंध नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी ‘संस्कृती’ हा शब्द वापरला होता याचाही त्यांनी उल्लेख केला.

संस्कृती आणि संवेदनांचा आदर -हर्षवर्धन सपकाळ

संस्कृती आणि संवेदनांचा आदर राखून आम्ही सुनेत्रा पवार यांच्याविरोधात न लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. ‘‘बारामतीच नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती. वैचारिक भूमिका म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी आकाश मोरे यांचा अर्ज भरला होता. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या निवडणुकीबाबत भावनिक दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन केले होते. सुनेत्रा पवार यांनीही तीन वेळा पह्नवर संवाद साधून पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली होती. यानंतर कॉंग्रेस श्रेष्ठाRशी चर्चा करून आम्ही माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे सपकाळ म्हणाले.

तरीही बिनविरोध नाहीच

बारामतीत 53 पैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी 23 उमेदवार हे रिंगणात कायम आहेत. त्यामुळे बारामतीत बिनविरोध निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसच्या माघारीमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

Comments are closed.