सिक्कीममध्ये अडकलेल्या 135 पर्यटकांची सुटका

हिमवृष्टी-भूस्खलनानंतर लष्कराकडून मदतकार्य

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सिक्कीममध्ये मुसळधार हिमवृष्टी होत असताना भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. लाचेनमध्ये जवळपास 1,000 पर्यटक अडकले असून, त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लष्कराने एकूण 135 अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली आहे. उत्तर भारतातील तीन पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे एप्रिल महिन्यातही हिवाळ्यासारखे वातावरण जाणवत आहे. गेल्या 20 दिवसांपासून राजस्थानमधील बदलत्या हवामानामुळे तापमानात 7 अंशांची घट झाली आहे. हवामान विभागाने छत्तीसगड आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये गुरुवारी वादळाचा इशारा जारी केला आहे.

जम्मू काश्मीर, लडाख, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, सिक्कीम, बंगाल, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये ‘कल बैसाखी’ प्रणाली सक्रिय झाली आहे. कल बैसाखी हे एक अचानक येणारे तीव्र वादळ आहे. ते एप्रिल-मे (वैशाख) महिन्यात येते. ही प्रणाली सक्रिय असताना वारे ताशी 50-100 किमी वेगाचे वाहतात. तसेच पाऊस आणि गारपीटही होते. आसाम आणि मेघालयमध्येही सध्या मेघगर्जना, पाऊस आणि गारपिटीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि किनारपट्टीवरील कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमध्ये दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Comments are closed.