आयपीएल अध्यक्षांचे वैभव सूर्यवंशीबाबत मोठे वक्तव्य, भारतीय संघात संधीची मागणी; आता बीसीसीआय काय करणार?
वैभव सूर्यवंशी याने खूप कमी काळात उत्तम कामगिरी करत क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. हा १५ वर्षीय खेळाडू आयपीएल २०२६ मध्ये जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना धक्के देत नवनवे विक्रम रचत आहे. त्याने चार सामन्यांमध्येच २६६.६६ च्या स्ट्राईक रेटने दोन अर्धशतकांसह २०० धावा केल्या आहेत. तो केव्हा भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करणार याचा चर्चा सुरू असताना आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.
वैभवने शुक्रवारी (१० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. त्याने एकापाठोपाठ स्फोटक खेळी करत पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी केली. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीने एक चर्चा सुरू झाली आहे. भारत त्याला वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पदार्पणाची संधी देण्यास तयार आहे का?
आयपीएलनंतर भारताची आयर्लंडविरुद्ध टी२० मालिका आहे आणि वैभवबद्दलची चर्चा भारतीय क्रिकेट प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याची निवड झाल्यास, तो १६ वर्ष आणि २०५ दिवसांचा असताना पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकून, भारताचा आतापर्यंतचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू ठरू शकतो.
वैभवला भारतीय पदार्पण करण्याची संधी दिली पाहिजे. याबाबत धुमाळ म्हणाले, “आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्याच्या कामगिरीमुळे हा प्रतिभावान खेळाडू बीसीसीआयकडून सर्वात तरुण खेळाडू म्हणून भारतीय संघात पदार्पण करण्यास निश्चितच पात्र आहे. एवढ्या प्रतिभावान आणि इतक्या लहान वयाच्या खेळाडूला संघात घेण्याची संधी मिळणे दुर्मिळ असते. भारतासाठी सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव नोंदवले जाण्यास तो पात्र आहे.”
आयसीसीच्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूचे वय किमान १५ वर्षे असणे आवश्यत आहे. वैभव याचवर्षीच्या २७ मार्चला १५ वर्षाचा पूर्ण झाला आहे, त्यामुळे तो भारताच्या वरिष्ठ संघात खेळण्यास पात्र आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषक २०२६ मध्ये अंतिम सामन्यात विलक्षण खेळी केली होती. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने ८० चेंडूत १७५ धावा केल्या होत्या.
Comments are closed.