महिला ड्रग्ज तस्कर दिल्लीत जेरबंद

11 गुन्हे दाखल; गुह्यात मुलींचाही सहभाग उघड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांनी ‘ड्रग्ज क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमला शाहदरा येथून अटक केली. तिच्या डोक्यावर 50,000 रुपयांचे बक्षीस होते. शाहदरा पोलिसांच्या माहितीनुसार, ते दोन महिन्यांपासून कुसुमचा शोध घेत होते. नुकतीच ती शाहदरा येथे पोहोचताच पोलिसांनी तिला घेरून अटक केली. या कारवाईसंबंधीची माहिती शनिवारी माध्यमांना देण्यात आली. कुसुम दिल्लीतून अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थांचे जाळे चालवत होती. अटकेनंतरही तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला पकडण्यात आले. तिला अटक करण्यासाठी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि 100 हून अधिक मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्ड तपासले.

2003 ते 2024 दरम्यान कुसुमवर एनडीपीएस कायद्यांतर्गत (अमली पदार्थांशी संबंधित) 11 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी करत असताना कुसुम सतत ठिकाणे बदलत होती. अनेकदा पोलीस पोहोचण्याच्या काही मिनिटे आधीच ती पळून जात असे. ती स्मार्टफोन वापरत नव्हती आणि वारंवार सिम कार्ड बदलून आपली संपर्क यंत्रणा सांभाळत होती, असेही सांगण्यात आले.

मुलींचाही गुन्ह्यात सहभाग

कुसुमच्या मुलीसुद्धा अमली पदार्थांच्या व्यापारात सामील होत्या. पोलिसांच्या अहवालानुसार, कुसुम हिच्या मुली, दीपा आणि चिकू यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. तिचा भाऊ हरिओम आणि त्याचा साथीदार रवी यांनाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला कुसुमने दिल्लीच्या सुलतानपुरी परिसरात लहान प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री सुरू केली होती. रोहिणी न्यायालयाने तिला फरार घोषित केले होते.

Comments are closed.