एसआरएच विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले; जाणून घ्या नेमकं कारण काय?
आयपीएल २०२६ च्या हंगामात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील साखळी फेरीतील १७ वा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचे खेळाडू मैदानात दंडाला काळी पट्टी बांधून खेळण्यासाठी उतरले. यामागचे कारण फ्रँचायझीने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावा केल्या आहेत.
शुक्रवार १० एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे एका दुर्दैवी नौका अपघातात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, या नौकेमध्ये दोन डझनहून अधिक पर्यटक होते, ज्यामध्ये बहुतेक पंजाबचे तीर्थयात्री होते. ही नौका खोल पाण्यात गेली आणि एका ‘पाँटून ड्रम’ला जाऊन धडकली. पाण्याची पातळी वाढल्यामुळे तात्पुरता पूल हटवण्यात आला होता, परंतु हा ड्रम तिथेच राहिला होता. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पंजाब किंग्सचे खेळाडू सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. पंजाब किंग्सने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, “वृंदावनमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. वृंदावन नौका दुर्घटना; या दुःखद घटनेने आम्हाला खूप वेदना झाल्या आहेत. मृतांच्या कुटुंबियांप्रती आमची खोल संवेदना आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या ६ षटकांतच धावसंख्या १०० च्या पार नेली होती. मात्र, मधल्या षटकांत त्यांना धावगती कायम ठेवता आली नाही, ज्यामुळे त्यांची धावसंख्या २१९ पर्यंत मर्यादित राहिली. या हंगामात आतापर्यंत पंजाब किंग्सचे गोलंदाज आपली चमक दाखवण्यात अपयशी ठरले आहेत. संघाने सुरुवातीला मिळवलेल्या तीन विजयांमध्ये फलंदाजांनीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Comments are closed.