संगीत शाळेला अखेरचा निरोप! उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर घुमली अखेरची धून; नेटकऱ्यांचे डोळे पाणावले
युद्ध आणि संघर्षाच्या सावटाखाली जेव्हा माणुसकी होरपळून निघते, तेव्हा कलाच मनातल्या वेदनांना वाट करून देते. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने जगभरातील नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. बॉम्बस्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या आपल्या संगीत शाळेला एका संगीतकाराने दिलेला शेवटचा निरोप काळजाला भिडणारा आहे. इराणमधील ‘hamidrezaafarideh’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस शाळा उद्ध्वस्त झालेल्या ढिगाऱ्यात बसून आपल्या वाद्यावर एक अत्यंत उदासपणे धून वाजवताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओने साऱ्यांचेच काळीज पिळवटून निघाले आहे.
या संगीतकारासाठी ही शाळा केवळ एक इमारत नव्हती, तर ते त्याचे आणि त्याच्या जोडीदाराचे संपूर्ण आयुष्य होते. 250 विद्यार्थ्यांच्या गोड आठवणी आणि 22 शिक्षकांची अतोनात मेहनत या भिंतींमध्ये सामावलेली होती. व्हिडिओमध्ये तो अत्यंत भावूक होऊन सांगतो की, हे ठिकाण कायमचे सोडण्यापूर्वी त्याला येथे शेवटचा आवाज संगीताचा ऐकायचा होता, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांच्या भीषण गर्जनांचा नाही. ही धून वाजवत असताना त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती आणि उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांचे दुःख स्पष्टपणे जाणवते. तो म्हणतो की, कदाचित हा या शाळेचा शेवटचा आवाज असेल आणि कदाचित उद्या तो स्वतःही जिवंत नसेल, पण हे सूर कायम जिवंत राहतील.
संगीत शाळेला अखेरचा निरोप! उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर घुमली अखेरची धून; नेटकऱ्यांचे डोळे पाणावलेhttps://t.co/benkEmnb6r pic.twitter.com/MR8zWrYubb
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 11 एप्रिल 2026
ज्यावेळी हा कलाकार आपली धून वाजवत असतो, तेव्हा आजूबाजूची भीषण शांतता आणि अधूनमधून होणाऱ्या स्फोटांची भीती अंगावर काटा आणते. त्याचे संगीत वातावरणात अशा प्रकारे विरघळते की जणू काही त्या भग्न भिंती आणि विटांनाही वाचा फुटली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर कमेंट्सचा पूर आला आहे. अनेक वापरकर्त्यांनी इराणच्या लोकांच्या धैर्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी हे संगीत ऐकून रात्रभर झोप लागणार नसल्याची भावना व्यक्त केली आहे. युद्धात सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराची ही आर्त हाक सध्या शांततेचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
Comments are closed.