नांदेड जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला, कुठलीही जिवितहानी नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत आज सकाळी 8.45 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

शनिवारी सकाळी नागरिक आपल्या नित्यकामात व्यस्त असताना अचानक जमीन हादरल्याने एकच गोंधळ उडाला. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव, हदगाव आणि हिमायतनगर या तालुक्यांमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू शेजारील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाजवळ जमिनीखाली दहा किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी भूकंपाचे धक्के नवीन नसले तरी आजच्या धक्क्याची तीव्रता तुलनेने जास्त असल्याने भीतीचे वातावरण अधिक आहे. यापूर्वी 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुखेड तालुक्यातील खपराळ येथे 3.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये 3.8 आणि 2011 मध्ये 3.0 तीव्रतेचे धक्के जाणवले होते. याशिवाय 2007 सालातही मार्च, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र, आजची 4.7 रिश्टर स्केलची तीव्रता मागील काही वर्षांतील सर्वाधिक असल्याने प्रशासन आणि नागरिक दोन्ही सतर्क झाले आहेत. आजच्या भूकंपाने कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी अचानक आलेल्या भूकंपाने नागरिक मात्र भयभित झाले आहे.

Comments are closed.