रोखठोक – भारताचे जहाज भरकटले! फुटक्या नौकेची तुफानाशी टक्कर

इराण-इस्रायल, अमेरिकेच्या युद्धबंदीत शांतिदूताचा मान पाकिस्तानला मिळाला. पंतप्रधान मोदींच्या फसलेल्या विदेश नीतीचा हा घोटाळा. इराणसारखा मित्र गमावला व जगाचा विश्वास आपण गमावून बसलो. भविष्यात भारताचे जहाज अधिक भरकटताना दिसेल.

फक्त एक तुटलेली बोट

बंडखोरी झाली

त्यामुळे काही दिवस हे वादळ

डोकं वर करायला विसरा.

– वसीम बरेलवी

वसीम बरेलवीचा हा शेर इराण-अमेरिका युद्धबंदीनंतर इम्रान प्रतापगडी यांनी समाज माध्यमांवर टाकला. तो सध्याच्या स्थितीत समर्पक आहे.

स्वत:ला जागतिक तुफान समजणाऱ्या अमेरिकेला इराणसारख्या सामान्य देशाने कशी अद्दल घडवली ते जग आनंदाने पाहत आहे. इराणचा संघर्ष हा त्यांच्या राष्ट्राभिमानी जनतेचे बंड होते. एका रात्रीत इराणची सभ्यता, संस्कृती नष्ट करू अशी धमकी प्रे. ट्रम्प यांनी देताच इराणची लाखो जनता त्यांच्या सार्वजनिक मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी मानवी साखळी बनून रस्त्यावर उतरली. इराणची दीड कोटी जनता बलिदानास तयार असल्याचे त्यांचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अरागची यांनी सांगितले व प्रे. ट्रम्प यांना `शांती’ चर्चेसाठी टेबलावर खेचून आणले, पण हे `टेबल’ पाकिस्तानच्या इस्लामाबादेत आहे, जे जगातील दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र आहे. अमेरिकेवर इतिहासातील सगळ्यात भयंकर दहशतवादी हल्ला करणारा `लादेन’ पाकिस्तानच्याच आश्रयाला होता व अमेरिकन कमांडोजनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले होते. भारतात दहशतवादी हल्ले करणारे सर्व म्होरके पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत. तोच पाकिस्तान इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात `शांतिदूताची’ भूमिका वठवत आहे. अमेरिकेने त्यांना शांतिदूत म्हणून मान्यता दिली.

प्रे. ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्काराची हाव सुटली आहे, पण युद्धखोर ट्रम्प यांना असा `शांती’ पुरस्कार देणे ही `शांतता’ संकल्पनेची बदनामी आहे. काय सांगावे? पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि त्यांचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना एकत्र नोबेल शांती पुरस्कार दिला जाईल! तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

पंतप्रधान काय करतात?

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती भिकारी राष्ट्रासारखी आहे. चीनसारख्या राष्ट्राकडून कर्ज घेऊन जगणारा देश पाकिस्तान. अमेरिकेकडे मदतीसाठी कटोरा घेऊन सदैव उभा राहिलेला देश म्हणजे पाकिस्तान. पुन्हा हा पैसा लष्करावर आणि दहशतवाद पोसण्यात जातो. पाक लष्कराची सर्व अय्याशी याच कर्जाच्या पैशांवर चालते. त्याच पैशांवर पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवून हल्ले करीत आहे. आता काय सांगायचे? पाकिस्तान कंगाल आहे, पण `नमस्ते ट्रम्प’सारखे उपक्रम त्यांनी राबवले नाहीत. पाकिस्तानात शिक्षण, रोजगार यांचा बोजवारा उडाला आहे. तरीही जागतिक युद्ध थांबवण्याचे श्रेय अमेरिकेने पाकिस्तानला दिले. पाकिस्तानची परराष्ट्र नीती भारतापेक्षा सरस झाली! आम्ही पाकिस्तानपेक्षा हजारपट पुढे आहोत, पण या जागतिक घडामोडीत भारताने कोणतीच भूमिका वठवली नाही. आमचे प्रधानमंत्री काय करतात? मुळात या देशाला पंतप्रधान आहे काय? देशाचे नेतृत्व करण्यासाठी अंधभक्तांनी सतत निवडणूक प्रचारात व्यस्त असलेला एक संघ प्रचारक निवडला. तो संघ प्रचारक स्वत:ला विश्वगुरू मानायला लागला. कालच्या युद्ध घडामोडीत विश्वगुरूचा मुखवटा गळून पडला.

भारत बेपत्ता आहे

जनतेच्या पैशांनी सतत जगभ्रमण करून जागतिक नेत्यांना मिठ्या मारणे म्हणजे परराष्ट्र नीती नाही. श्रीमान मोदी यांनी गेल्या 11 वर्षांत हे मिठ्या मारण्याचे व जागतिक नेत्यांच्या गळ्यात पडण्याचेच धंदे केले. यातून काहीच साध्य झाले नाही.

मोदींनी आतापर्यंत दोन जागतिक कार्यक्रम केले. त्यांच्या पहिल्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना खास आमंत्रित केले. त्याचा डांगोरा पिटला.

त्याच नवाज शरीफ यांच्या मुलीच्या लग्नात व शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी इस्लामाबादेत खास केक खायला गेले. त्या मास्टरस्ट्रोकचा तर शंखनादच केला.

ही कामगिरी सोडली तर मोदी यांनी जागतिक पातळीवर कोणतीच चमक दाखवली नाही. परदेशात `मोदी मोदी’ करणारे भाडोत्री अंधभक्त आणायचे व त्याची रसभरीत वर्णने भारतीय मीडियात दाखवायची यापेक्षा मोदी यांनी काही वेगळे केल्याचे दिसत नाही. मोदी काळात भारताची अर्थव्यवस्था व परराष्ट्र धोरण ठार मेले आहे. मुळात असे कोणतेच धोरण ते निर्माण करू शकले नाहीत.

जेव्हा संपूर्ण `मध्यपूर्व’ जळत होते, स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाले होते, जगभरात तेलाचे दर आकाशाला भिडले होते, तेव्हा मोदींचा भारत काय करत होता?

जेव्हा इस्रायल `गाझा’वर निर्घृण हल्ले करून लहान मुलांच्या कत्तली करत होता, तेव्हा मोदींचा भारत काय करत होता?

जेव्हा तेहरानमधील मुलींच्या शाळेवर इस्रायलने बॉम्बहल्ला करून 200 निष्पाप मुलींचे बळी घेतले तेव्हा मोदींचा भारत कोठे होता?

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संवादात भारताची कुठलीच भूमिका नव्हती. या जागतिक संकटात भारत पूर्णपणे गायब होता.

हे गायब मोदी सध्या पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात राजकीय विरोधकांवर रोज लाखोली वाहत आहेत!

जहाज भरकटले!

इराण-इस्रायल, अमेरिकेच्या भानगडीत भारताने का पडायचे? त्यांचे ते पाहून घेतील, असा युक्तिवाद मोदीभक्त करतात तेव्हा भारताच्या जागतिक अस्तित्वाविषयी चिंता वाटू लागते. तसे असेल तर `विश्वगुरू’ या स्वयंघोषित उपाधीची होळी केली पाहिजे. बरं, अमेरिकेतील निवडणूक प्रचाराचा बार भारतात उडवून `नमस्ते ट्रम्प’सारखे प्रचारी कार्यक्रम आयोजित करण्याचे तरी उद्योग मग यांनी का करावेत?

जागतिक मंचावर महत्त्वाची भूमिका वठवण्याचा, युद्धकाळात `शांतिदूत’ म्हणून कार्य करण्याचा मोठा अनुभव भारताला आहे.

विदेश नीतीतील सध्याच्या अर्धवटरावांनी स्वातंत्र्यानंतरचा इतिहास चाळला तर त्यांना अशी अनेक उदाहरणे दिसतील. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विश्वशांतीसाठी मोठे काम केले. अनेक देशांतील युद्धविराम (Cease Fire) आणि शांतता स्थापनेत निर्णायक भूमिका निभावली. संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनच्या  (UN Peace Keeping) माध्यमातून भारताने मोठे काम केले.

कोरिया (1953) : भारताने दोन कोरियांमधील युद्ध समाप्तीसाठी जो `आर्मिस्टिक करार’ (Armistice Agreement) झाला, त्यात महत्त्वाची भूमिका निभावली. भारत `न्यूट्रल नेशन्स रिपॅट्रिएशन कमिशनचा (NNRC)  अध्यक्ष होता. युद्धबंदीची अदलाबदल सुरळीत करण्याची जबाबदारी या कमिशनकडे होती.

व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया (1954) : चीन युद्धानंतरची परिस्थिती हाताळणाऱ्या आंतरराष्ट्रीय समितीचे नेतृत्व भारताकडे होते.

सुएझ कालवा संकटाच्या वेळी ब्रिटन, फ्रान्स, इस्रायलने इजिप्तवर हल्ला केला तेव्हा भारताने युद्धविराम होण्याबाबत कठोर पावले उचलली व चारही देशांत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून पुढाकार घेतला.

कांगोचे संकट : 1960-64 च्या दरम्यान तेथील गृहयुद्ध थांबवून शांतता निर्माण करण्यासाठी भारताने आपले सैन्य तेथे पाठवले. संयुक्त राष्ट्रांच्या यशस्वी मोहिमांपैकी `कांगो’ मोहीम महत्त्वाची आहे.

भारताने 1955  मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियन व ऑस्ट्रियामध्ये समझोता घडवून आणला. त्यानुसार सोविएत सैन्याची `वापसी’ झाली. ऑस्ट्रियाने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले.

लेबनान, सुदान, दक्षिण सुदान, सायप्रस, लायबेरिया, सोमालिया, रवांडासारख्या देशांत `शांती मिशन’च्या माध्यमातून भारताने युद्धविराम घडवून आणला.

भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर स्वत:चे मत व स्थान निर्माण केले. मोदी हे त्याबाबतीत अपयशी ठरले.

`ऑपरेशन सिंदूर’, पहलगाम हल्ल्याच्या निमित्ताने मोदी यांनी सर्वपक्षीय निवडक खासदारांना जागतिक मोहिमेवर पाठवून पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे अनेक राष्ट्रांना सांगितले.

इराण-इस्रायल, अमेरिका युद्धबंदीत पाकिस्तानला शांतिदूताचा मान मिळाल्याने मोदींचे अपयश उघडे पडले.

इराणने अमेरिकेला नमवले.

एका फुटक्या नौकेने वादळाशी सामना केला.

मोदींचे जहाज मात्र त्या वादळात भरकटले व गायब झाले.

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Comments are closed.