पार्थ चॅटर्जी यांच्या निवासस्थानावर ईडीने छापे टाकले

पश्चिम बंगालमधील निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या धामधुमीत, केंद्रीय सुरक्षा दलांच्या मोठ्या बंदोबस्तात ईडीच्या पथकाने शनिवारी माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निवासस्थानी छापा टाकला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या कारवाईमुळे अनेक वर्षे बंगालच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या कारवाईचा आगामी विधानसभा निवडणुकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण बंगालच्या राजकारणात भ्रष्टाचार हा नेहमीच एक मोठा मुद्दा राहिला आहे.

शनिवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत तपास अधिकारी पार्थ चॅटर्जींच्या घरी पोहोचले तेव्हा संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण होते. ही कारवाई शालेय शिक्षक भरती घोटाळ्याच्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे. निवडणुकीपूर्वी काही महत्त्वाचे दुवे जोडणे आवश्यक असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना वाटत असल्यामुळे पार्थ चॅटर्जींची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे होते.

पार्थ चॅटर्जी बऱ्याच काळापासून तपासात सहकार्य करण्यास टाळाटाळ करत होते, पण आता तपास यंत्रणेने त्यांच्या दारावर छापा टाकला आहे. पार्थ चॅटर्जी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यापासून ईडीने त्यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, प्रत्येकवेळी माजी मंत्र्यांनी आपली ढासळती प्रकृती आणि गंभीर आजाराचे कारण देत हजर होण्यास नकार दिला. त्यांनी तपास यंत्रणेला गरज पडल्यास त्यांची व्हिडिओ कॉलद्वारे किंवा त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली जाऊ शकते, असे म्हटले होते.

Comments are closed.