अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे शांतता चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही; इराणचा दावा

इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ झाल्यानंतर, दोन्ही देशाने आता त्यांची भूमिका आपापल्या परीने मांडण्यास सुरुवात केली आहे. “जे त्यांना युद्धात जिंकता आले नाही, ते वाटाघाटींमधून मिळवण्याचा प्रयत्न करत होते,” असे इराणने अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेनंतर म्हटले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरली असून, याकरता इराणने अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांना जबाबदार धरले आहे. इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने म्हटले आहे की, अमेरिकेने खूप अवास्तव मागण्या आणि जाचक अटी लादल्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. इराणने केलेल्या युक्तिवादानुसार, अमेरिकेने इतक्या मागण्या केल्या की कोणत्याही ठोस पर्यायावर थांबता आले नाही. होर्मुझची सामुद्रधुनी, अणुहक्क आणि इतर अनेक मुद्दे ही चर्चा अयशस्वी होण्याची कारणे आहेत.

इराणी जनतेच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी इराणी शिष्टमंडळाने २१ तास सातत्याने आणि सखोलपणे चर्चा केली. इराणी शिष्टमंडळाने विविध पुढाकार घेऊनही, अमेरिकन बाजूच्या अवाजवी मागण्यांमुळे चर्चेच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला. परिणामी, ही चर्चा संपुष्टात आली,” असे इराणच्या सरकारी प्रसारक संस्थेने (IRIB) टेलिग्रामवर म्हटले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने १०-कलमी अटींचा प्रस्ताव पुढे ठेवला होता. या अटींमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या नियंत्रणाला मान्यता देणे आणि त्यातून जाणाऱ्या जहाजांकडून वाहतूक टोल वसूल करण्याचा हक्क यांचा समावेश होता. शिवाय, शांततापूर्ण अणुऊर्जेसाठी युरेनियम समृद्ध करण्याचा हक्क कायम ठेवला पाहिजे.

फार्स वृत्तसंस्थेनुसार, इराणी शिष्टमंडळाच्या जवळील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने वाटाघाटींद्वारे त्या सर्व गोष्टींची मागणी केली, ज्या त्यांना युद्धादरम्यान मिळू शकल्या नाहीत. “इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनी, शांततापूर्ण अणुऊर्जा आणि इतर अनेक मुद्द्यांवर अमेरिकेने अटी स्वीकारण्यास नकार दिला.”

Comments are closed.