ऐकावे जनांचे… – नव्या दमाचा पॉडकास्टर

>> अक्षय मोटेगावकर
[email protected]

व्यावसायिक ज्ञान प्रभावीपणे मांडण्याची कला अवगत असणाऱया राज शमानीचे याच नावाचे यूटय़ूब चॅनेल आश्वासकतेसोबतच वैचारिक ऐश्वर्यही बहाल करते. आवर्जून ऐकावे असे… जगातल्या एका मोठय़ा राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष भारतात येतो आणि तो शासकीय कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या माध्यम प्रतिनिधींव्यतिरिक्त फक्त तुमची निवड करतो प्रत्यक्ष वैयक्तिक मुलाखतीसाठी यापेक्षा मोठी कोणती गोष्ट असू शकेल एका पाडकास्टरसाठी! अर्थातच आपल्यापैकी बऱयाच जणांनी राज शमानी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रों याचा पाडकास्ट पाहिला असेलच. ही एका पाडकास्टरसाठी फार मोठी उपलब्धी आहे, पण राज शमानीची ही उपलब्धी त्याला सहजासहजी मिळालेली नाहीये. त्यामागे प्रचंड मेहनत आहे. निरंतर चालू ठेवलेले प्रयत्न आहेत आणि स्वत वर ठेवलेला विश्वास आहे.

इंदूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या राजने आपले बीबीए आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले व वडिलांच्या व्यवसायात हातभार लावायला सुरुवात केली. राजच्या वडिलांचा कपडे धुण्याचे साबण आणि पावडर तयार करण्याचा कारखाना होता. ‘जादूगार’ डिटर्जंट हा त्यांचा ब्रॅण्ड. राजने आपले शिक्षण वापरून त्याचा विस्तार करायचे ठरवले. त्यात त्याला यशही मिळाले, पण हे करत असताना त्याला जाणवले की, व्यवसायवृद्धीसाठी एक तर तुमच्याकडे मोठे भांडवल हवे किंवा मोठा चाहता वर्ग वा तुम्हाला ओळखणारा मोठा समूह हवा. हल्लीच्या इंटरनेटच्या युगाच्या भाषेत चांगला ‘रिच’ (तुमच्या फॅन्स, फालोअर्स, सबक्राइबर्सबरोबर पोहोच) हवा. भांडवल उभे करणे अवघड होते, पण याचा वेगळा फायदा असा झाला की राजने आपल्या इंट्रोव्हर्ट, लाजाळू स्वभावाच्या विरुद्ध जाऊन स्वतला घडवले आणि तो बोलायला शिकला. बीबीए आणि एमबीएच्या शिक्षणामुळे मिळालेले व्यावसायिक ज्ञान प्रभावीपणे मांडण्याची कला त्याने अवगत केली होती. त्याने लोकांशी बोलायला सुरुवात केली. इंटरनेटचा प्रभावीपणे वापर करायला सुरुवात केली आणि स्वतचे यूटय़ूब चॅनेल सुरू करून तिथे तो वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेऊ लागला. त्याला कळून चुकले होते की, इंटरनेटच्या या युगात तुमचा रिच, तुमचा चाहता वर्ग, तुमचे सबक्राइबर्स आणि फालोअर्स हेच तुमच्या संपत्तीच्या रूपात काम करणार आहेत.

राज शमानीने घेतलेल्या मुलाखतींच्या क्लिप्स पाहण्यात आल्या होत्याच, पण मग सोबत त्या मुलाखतींचे पूर्ण पाडकास्टस ऐकायला सुरूवात केली. राज ज्या शांतपणे, थेट, कोणताही आडपडदा न ठेवता जे प्रश्न विचारतो त्याची मजा वाटू लागली. अर्थातच हे पाडकास्टस हिंदी आणि इंग्रजीतून आहेत तरीही बोजड वाटत नाहीत. तसेच कुठेही अवघड इंग्रजीचा मारा नाहीये.

‘राज शमानी’ या नावाने असलेल्या त्याच्या यूटय़ूब चॅनेलवर तो ‘फिगरिंग आऊट विथ राज शमानी’ या सदराखाली मुलाखती घेतो. आजमितीला या पॉडकास्ट लिस्टमध्ये 495 व्हिडीओज आहेत. त्यापैकी मला आवडलेले आणि खास लक्षात राहिलेले पॉडकास्टस मी येथे नमूद करतो, जे आवर्जून ऐकावेच असे आहेत.

या मुलाखतींमधील कॉमेडियन झाकीर खानची मुलाखत फार मनमोकळी वाटली. राजने अगदी आपल्या मोठय़ा भावाला विचारावेत आणि त्याच्या कडून त्याच्या आयुष्यातील चुका किंवा मिळालेल्या शिकवणींबद्दल विचारावे तसे जाणवले. झाकीर खानची आणि राजची जीवनाकडे बघण्याची दृष्टी किती निकोप व संवेदनशील आहे हे सतत जाणवते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करून घेणारे खान सर आणि विकास दिव्यकीर्ती यांच्या मुलाखतीही छान आहेत. यश-अपयश कसं स्वीकारावे, आयुष्यातील स्पर्धात्मकता कशी टिकवून ठेवावी यावर अव्वल फ़ुटबॉलपटू सुनील छेत्रीबरोबरचा पॉडकास्ट मार्गदर्शक ठरतो. प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक शिव खेरा यांच्या बरोबर जेव्हा राज भारतीय न्यायव्यवस्था, लोकसंख्या वाढ, भारतासमोरील आव्हाने यावर बोलतो तेव्हा नकळत आपणसुद्धा विचार करायला लागतो. ध्यास काय असतो यावर जेव्हा राज जगप्रसिद्ध जलतरणपटू मायकल फेल्प्सबरोबर बोलतो तेव्हा आपणसुद्धा मायकल फेल्प्सबरोबर त्याचा संघर्ष अनुभवतो. हे पॉडकास्ट खऱया अर्थाने वैचारिक ऐश्वर्य बहाल करणारे आहेत. किशोर बियाणींसोबत केलेला पॉडकास्ट ‘बिग बाजार’च्या अपयशाची कारणमीमांसा करतो, नव्या पिढीला व्यवसायात कोणती काळजी घेतली पाहिजे हे सांगतो.

पण पॉडकास्टिंग हा राजचा मूळ हेतू किंवा व्यवसाय नाहीये. मुळात तो उद्योजक आहे आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती व इन्फ्लुएन्सर्ससोबत चांगला व्यवसाय थाटून त्यांना मोठा करणे हा त्याचा व्यवसाय आहे. ‘हाऊस ऑफ एक्स’बद्दल थोडे शोधा, तुम्ही चकित व्हाल.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)

Comments are closed.