मिर्झापूरमध्ये वकिलाची गोळ्या झाडून हत्या

दोन्ही हल्लेखोर फरार : पोलिसांकडून शोध सुरू

वृत्तसंस्था/ मिर्झापूर

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे शनिवारी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारत असताना एका ज्येष्ठ वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी वकिलाला रस्त्यात थांबवून पिस्तुलाने त्याच्या छातीत गोळी झाडली. रक्ताने माखलेले वकील जमिनीवर कोसळले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. वकिलाचे नाव राजीव सिंग (45) असे आहे. त्यांची पत्नी गावची सरपंच असून त्यांनी स्वत: दोनदा सरपंच म्हणून काम केले आहे. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटवारू का पुरा परिसरात घडली.

हत्येची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. एका मिनिटाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर मोटरसायकलवर असल्याचे दिसत आहे. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आरोपी गाडी चालवत होता. पांढरी पँट आणि गळ्यात स्कार्फ घातलेला हल्लेखोर मागे बसला होता. वकिलाला पाहताच हल्लेखोर हातात पिस्तूल घेऊन खाली उतरला. त्याने गाडी थांबवली आणि गोळी झाडली. घटनेनंतर, हल्लेखोर आणि त्याच्या साथीदाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण बाईक सुरू झाली नाही. बाईक चालवणाऱ्या दुसऱ्या आरोपीने बाईकला 15-16 वेळा किक मारली, पण काहीच झाले नाही. हल्लेखोराने त्याला मागे ढकलले आणि स्वत: बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना लोक हल्लेखोरांना पकडायला धावले. मात्र, हल्लेखोरांनी लोकांना पिस्तुलाने धमकावले. त्यानंतर बाईक सुरू होताच दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.

Comments are closed.