'असंच सुरू ठेव': पाकिस्तानी फिरकीपटूविरुद्ध माघार घेणाऱ्या फलंदाजाला अश्विनचा पाठिंबा, उस्मान तारिकनेही दिली प्रतिक्रिया
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या हंगामातील एका सामन्यादम्यान डॅरिल मिचेलने उस्मान तारिकचा चेंडू खेळण्यास नकार दिल्यानंतर त्याला आर अश्विनने पाठिंबा दिला. त्याच्या या पाठिंब्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू तारिकनेही प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामुळे हा वाद आणखीनच वाढला आहे. मिचेल एकदा नाही तर दोनदा त्याचा चेंडू खेळण्याआधी बाजूला झाला होता.
चेंडू टाकण्याआधी थोडा थांबत बाजूने चेंडू टाकण्याच्या शैलीमुळे तारिक मागील काही महिन्यांपासून चर्चेत आला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ दरम्यान त्याच्या या गोलंदाजी ऍक्शनची चर्चा अधिकच झाली. तेव्हा त्याच्या या ऍक्शनला कायदेशीर आणि त्याचा होणारा परिणाम यावर चाहत्यांची मते विभागली गेली.
टी२० विश्वचषकात भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी अश्विनने सुचविले की, तारिक धावताना थांबत असेल, तेव्हा फलंदाज नियमांनुसार मागे सरकू शकतो. तेव्हा हे वापरले गेले नसले तरी मिचेलने शुक्रवारी (१० एप्रिल) क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध रावळपिंडीज सामन्यात याचा वापर केला. त्या सामन्यात मिचेलने रावळपिंडीजकडून खेळताना तारिक चेंडू टाकत असताना दोनदा बाजूला झाला होता. त्याच्या या पावित्र्यावर अश्विनने पाठिंबा दर्शवला होता.
अश्विनने त्याच्या अधिकृत एक्सच्या अकाऊंटवरून मिचेल-तारिकच्या व्हिडिओला रिपोस्ट करत ‘शाब्बास मिचेल’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर तारिकने गैरप्रकारांशी संबंधित कायद्याचा संदर्भ देत उत्तर दिले आहे.
तारिक म्हणाला, “खेळाडूवृत्ती नसलेले वर्तन, जर फलंदाज मुद्दाम गोलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी किंवा वेळ वाया घालवण्यासाठी सतत असे करत असेल, ते तो अयोग्य मानले जाऊ शकते. यावेळी पंचांना फलंदाजाला ताकिद देण्याचा अधिकार आहे. समजा, ते तसेच सुरू राहिले तर दंडही ठोठावला जाऊ शकतो (क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ धावा). ५ पेनाल्टी धावा मिळाल्याचे ऐकून आनंद झाला, असेच चालू राहु द्या.”
अश्विननेही त्याच्या कारकिर्दीत थांबून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे.
Comments are closed.