संगीत विश्वातील तेजस्वी तारा आशा भोसले यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा; सचिन-विराटसह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण
भारतीय संगीत क्षेत्रातील देदीप्यमान तारा, आशा भोसले (Legendary singer Asha bhosale passes away at age of 92) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. 11 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ संगीत क्षेत्रच नव्हे, तर क्रिकेट जगतातही दुःखाची लाट पसरली आहे.
आशा ताईंना आपली मोठी बहीण मानणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे, आजचा दिवस भारत आणि जगभरातील संगीत प्रेमींसाठी अत्यंत कठीण आहे. आशा ताई आमच्या कुटुंबाचाच एक भाग होत्या. आज आम्हाला जे दुःख होत आहे, ते शब्दांत मांडणे कठीण आहे. एक क्षण हृदय सुन्न होते, तर दुसऱ्याच क्षणी त्यांनी दिलेल्या अजरामर गाण्यांच्या आठवणी मनात गर्दी करतात. असे वाटतेय जणू काळ थांबला आहे. ताई, आमच्या आयुष्यात प्रेम आणि अविस्मरणीय संगीत दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या गाण्यांच्या रूपाने सदैव आमच्यात जिवंत राहाल.
सचिनसोबतच इतरही खेळाडूंनी आशा ताईंना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे, विराटने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले, ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो. तुमचा आवाज करोडो लोकांच्या हृदयाला भिडला आहे आणि तो कायम आमच्या मनात राहील. ओम शांती. तसेच शिखरने ‘X’ (ट्विटर) वर लिहिले की, एक असा आवाज जो कधीही जुना झाला नाही. आशा भोसले जी नेहमी आमच्या हृदयात राहतील. त्याचसोबत अजिंक्य रहाणेने लिहिले, आशा ताईंच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांचा आवाज केवळ संगीत नव्हते, तर ती एक भावना होती. त्यांच्या कुटुंबाप्रति मी संवेदना व्यक्त करतो. संगीत विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे, परंतु त्यांचे गाणे आणि त्यांचा आवाज पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहील.
Comments are closed.