इस्त्रायलवर हल्ला करणं हे आमचं कर्तव्य , शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी इस्रायलला अत्यंत कडक शब्दांत इशारा देत आखाती देशांमधील तणाव वाढल्यास तुर्की गप्प बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यास, तुर्की कोणतीही ठोस कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा एर्दोगान यांनी इस्रायलला दिला आहे.

आपल्या निवेदनात त्यांनी इस्रायलवर मानवतावादी मूल्ये पायदळी तुडवत हल्ले केल्याचा आणि संपूर्ण प्रदेशात अस्थिरता पसरवल्याचा आरोप केला. विशेषतः युद्धविरामाच्या दिवशी लेबनॉनमध्ये झालेोल्या नागरिकांच्या हत्येचा त्यांनी तीव्र निषेध केला असून, इस्रायलच्या या कृतींना नरसंहाराची कृती असे म्हटले आहे. तुर्कीयेच्या या भूमिकेमुळे आगामी काळात या प्रदेशातील राजकारण अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंध सुधारण्याचे प्रयत्न एका क्लिष्ट वळणावर येऊन थांबले आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तेहरानला एक नवीन प्रस्ताव सादर केला असून, त्याला अमेरिकेचा ‘शेवटचा आणि सर्वोत्तम प्रस्ताव’ असे म्हटले जात आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, 21 तास चाललेल्या दीर्घ वाटाघाटींमध्ये अध्यक्ष ट्रम्प स्वतः थेट सहभागी होते. मात्र, इराणने या प्रस्तावावर सावध भूमिका घेतली असून कोणत्याही करारासाठी घाई नसल्याचे संकेत दिले आहेत. आता चेंडू वॉशिंग्टनच्या कोर्टात असून त्यांनी वास्तववादी प्रतिसाद द्यावा, अशी भूमिका इराणने घेतल्याने ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

या सर्व घडामोडींचा परिणाम जागतिक तेल व्यापारावर होण्याची शक्यता आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण असून, जोपर्यंत अमेरिका योग्य तोडगा काढत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलू देणार नाही असा इशारा इराणने दिला आहे. जागतिक तेल वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.