अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार आहे.

57 दिवस चालणार यात्रा : 28 ऑगस्ट रोजी होणार समारोप : 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू

वृत्तसंस्था/

अमरनाथ यात्रेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यंदा यात्रा 3 जुलैपासून 28 ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचे जाहीर केले आहे.  57 दिवस चालणाऱ्या या यत्रेसाठी जम्मूच्या भगवती नगर बेस कॅम्पमधून पहिली तुकडी रवाना होणार आहे. यात्रेसाठी नोंदणी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 13-70 वयोगटातील लोक ही यात्रा करू शकतात. पवित्र गुहेत पहिली पूजा 19 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला पार पडणार असल्याची माहिती उपराज्यपाल सिन्हा यांनी दिली आहे. यात्रेसाठी अनंतनाग येथून पारंपरिक 48 किलोमीटर लांब नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबल येथून 14 किलोमीटर लांब बालटाल मार्ग खुला राहणार आहे.

बँकशाखेतून ऑफलाइन नोंदणी

देशभरातील जवळपास 556 निर्धारित बँक शाखांद्वारे यात्रेची नेंदणी करता येणार आहे. तर श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन नोंदणी होऊ शकणार आहे. नोंदणीसाठी येस बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बॅक, स्टेट बॅक आणि अॅक्सिस बँकेच्या शाखांमध्ये यात्रेचे नोंदणी अर्ज उपलब्ध होतील असे सिन्हा यांनी सांगितले.

यात्रेत यावेळी काय नवे?

-मागील वर्षांच्या तुलनेत व्यवस्थांमध्ये 25 टक्क्यांची वृद्धी करण्यात आली आहे. ट्रॅकिंग आणि सुरक्षाव्यवस्था प्रभावी करण्यासाठी आरएफआयडी कार्डची सुरुवात करण्यात आली आहे. -भाविकांच्या समूह दुर्घटना विमा व्याप्तीला दुप्पट करत हे प्रमाण 5 लाखावरून वाढवत 10 लाख करण्यात आले. यात्रेदरम्यान वापर होणाऱ्या खेचरांचा मृत्यू झाल्यास 50 हजारांची भरपाई.

अमरनाथ यात्रेसाठीचे दोन मार्ग

1 पहलगाम रोड

या मार्गावरून गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 3 दिवस लागतात, परंतु हा मार्ग सोपा आहे. यात्रेत उभी चढाई नाही. पहलमामधून पहिला टप्पा चंदनवाडी असून हे बेस कॅम्पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. येथूनच चढाई सुरू होते. तीन किमी चढाईनंतर यात्रा पिस्सू टॉपला पोहोचते. येथून पायी चालत भाविक संध्याकाळपर्यंत शेषनागला पोहोचतात. हा प्रवास सुमारे 9 किलोमीटरचा आहे. दुसऱ्या दिवशी शेषनाग येथून भाविक पंचतरणी येथे जातात. हे ठिकाण शेषनागपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर आहे. पंचतरणी येथून पवित्र गुहा केवळ 6 किलोमीटरवर आहे.

2 बालटाल मार्ग

वेळ कमी असल्यास बाबा  अमरनाथ दर्शनासाठी बालटाल मार्गाने जाता येते. यात केवळ 14 किमीची चढाई करावी लागते. परंतु ही एकदम उभी चढाई असल्याने वृद्धांना या मार्गावर त्रास होतो. या मार्गावर चिंचोळे मार्ग आणि धोकादायक वळणे आहेत.

यात्रेदरम्यान घ्यावी लागणारी खबरदारी

यात्रेदरम्यान वैद्यकीय प्रमाणपत्र, 4 पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड आरएफआयडी कार्ड, प्रवास अर्ज स्वत:सोबत बाळगावा लागणार आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दररोज 4-5 किलोमीटर चालण्याचा सराव केल्यास उत्तम ठरणार आहे. यात्रेत लोकरी कपडे, ट्रॅकिंग स्टिक आणि पाण्याची बाटली तसेच आवश्यक औषधांची बॅग स्वत:सोबत बाळगावी.

Comments are closed.