बुमराहला कुणाची नजर लागली का? सलग चौथ्या सामन्यातही विकेट नाही; एमआयची डोकेदुखी….
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या अचूक यॉर्कर आणि घातक स्पेल्ससाठी ओळखला जातो. “यॉर्कर किंग” म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुमराहकडून प्रत्येक सामन्यात विकेट्सची हमी मानली जाते. मात्र आयपीएल 2026 मध्ये त्याच्यावर जणू काही वाईट काळ आला असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्टार गोलंदाजाला विकेट्ससाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे.
आयपीएल 2026 मध्ये बुमराहने सलग चार सामन्यांमध्ये विकेट न घेण्याची दुर्मिळ घटना अनुभवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या चौथ्या सामन्यातही त्याने पूर्ण ताकद लावली, पण तरीही यश मिळाले नाही. या सामन्यात त्याने 4 षटकांची गोलंदाजी केली. ज्यामध्ये 35 धावा खर्च केल्या. विकेटच्या शोधात असलेल्या बुमराहला पुन्हा एकदा निराशा पदरी पडली.
याआधीच्या तीन सामन्यांमध्येही बुमराहला यश मिळाले नव्हते. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 4 षटकांत 35 धावा दिल्या, मात्र विकेट मिळाली नाही. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 4 षटकांत 21 धावा दिल्या, पण तरीही विकेटचा दुष्काळ कायम राहिला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध तिसऱ्या सामन्यात तर त्याने 3 षटकांत 32 धावा खर्च केल्या आणि पुन्हा अपयश आले.
बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजासाठी सलग चार सामन्यांमध्ये विकेट न मिळणे ही आयपीएलमधील अत्यंत दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर दबाव वाढताना दिसत आहे. इतर गोलंदाजांवरही अतिरिक्त जबाबदारी येत असल्याने संघाच्या संतुलनावर परिणाम होत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
तरीदेखील बुमराहचा आयपीएलमधील एकूण रेकॉर्ड अत्यंत प्रभावी राहिला आहे. 2013 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या बुमराहने आतापर्यंत 149 सामने खेळले असून 183 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन 10 धावांत 5 विकेट्स असे राहिले आहे. आयपीएलमध्ये त्याने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
Comments are closed.