Share Market News – इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटली, शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1600, निफ्टी 490 अंकांनी कोसळला

इराण आणि अमेरिकेतील शांतता चर्चा फिस्कटल्याने मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढू लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे संकेत दिल्याने जागतिक राजकारणामध्ये खळबळ उडाली. याचे पडसाद आज हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही उमटले. सोमवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये मोठी घसण झाली. इराण-अमेरिकेतील शांतता चर्चा फिस्कटल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून बाजारातील घसरणीचे हे एक मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला होता. या दरम्यान इराण-अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये चर्चाही झाली. मात्र ही चर्चा फिस्कटली आणि आखातात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. याचे पडसात सोमवारी बाजार उघडताच दिसले. सेन्सेक्स 1613.09 अंकांनी कोसळून 75,937.16 वर पोहोचला. निफ्टीमध्येही 495 अंकांची घसरण होऊन तो 23,555.60 वर पोहोचला. यामुळे अवघ्या काही क्षणामध्ये गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बाजार कोसळण्याची प्रमुख कारणे

– अमेरिका-इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 8 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 101.86 डॉलरवर पोहोचल्या आहेत.

– अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती नाविक नाकेबंदी करण्याची योजना आखली आहे, तर इस्रायलनेही इराणवर पुन्हा हल्ले करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

21 तासांची चर्चा निष्फळ; अमेरिकेच्या अटी इराणने धुडकावल्या, ट्रम्प यांनी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले

सर्वच क्षेत्रामध्ये विक्रीचा सपाटा

बाजारात आज सर्वच सेक्टरमध्ये लाल निशाण पाहायला मिळाले. सर्वाधिक फटका निफ्टी पीएसयू बँक आणि रिअल्टी क्षेत्राला बसला असून यात 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यासह ऑटो, बँक, वित्तीय सेवा, मीडिया आणि ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये 2 टक्क्यांहून अधिक कोसळली आहेत.

होर्मुझची नाकेबंदी! ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा; आता एकाही जहाजाला येण्या-जाण्याची परवानगी दिली जाणार नाही

रुपयाचीही घसरण

शेअर बाजारासोबतच हिंदुस्थानी रुपयावरही मोठा दबाव दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया 57 पैशांनी घसरून 93.30 वर उघडला. शुक्रवारी रुपया 92.73 वर बंद झाला होता.

Comments are closed.