देवेंद्रजी दिल्लीत जाण्याआधी त्यांचा वारसदार… संजय राऊत यांचा टोला
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढत आहेत. त्यांनी नुकताच प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यावरून सध्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रचारादरम्यान अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करतील अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
”अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. सुनेत्राताईंना जर भाजप मुख्यमंत्री करणार असतील तर भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्रजी दिल्लीत जाण्याआधी त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदेऐवजी सुनेत्राताईंची निवड करतायत की काय असं या नेत्यांच्या वक्तव्यावरून जाणवतंय”, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान सुनेत्रा पवारांच्या प्रचारातून शरद पवार यांचा फोटो हटवल्याची सध्या चर्चा रंगली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात ते शरद पवारांमुळे आहात, याचा विसर पडता कामा नये. आम्ही आज सर्व आहोत ते ठाकरे या नावामुळे. ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव बाळासाहेब ठाकरेंनी मिळवून दिलाय. तेच नसते तर आम्ही काय? तुमच्या पूर्वसुरींनी तुमच्या नावाला वलय ताकद निर्माण केली त्यामुळे तुम्ही आहात. बारामती म्हणजे शरद पवार. आज मोदी शहांनी कुणालाही उभं केलं असेल तरी शरद पवार नसते किंवा त्यांनी बारामती उभी केली नसती तर त्यानंतरच्या कुठल्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतंही स्थान मिळालं नसतं. बाळासाहेब ठाकरेंनी कोणतेही कष्ट घेतले नसते, शिवसेना उभी केली नसती तर आम्हाला सर्वांना या राज्यात काहीही करता आलं नसतं. त्यामुळे माणसानं किमान कृतज्ञता ठेवायला हवी”.
Comments are closed.