डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गदर्शक सूचना जारी, 13 आणि 14 एप्रिल रोजी मार्गांत मोठे बदल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यात 13 आणि 14 एप्रिल रोजी वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.
सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली घाटे यांनी ‘मोटार वाहन कायदा’ कलम 115 अन्वये आणि संबंधित अधिसूचनांनुसार तात्पुरते वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, प्रभावित क्षेत्रांमधील वाहतुकीचे नियमन 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत केले जाईल.
सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन, रानडे रोड आणि ज्ञानेश्वर मंदिर रोड हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असेल. सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंतचा मार्ग वन-वे असेल. बेस्ट बसेस वगळता सर्व जड वाहने माहीम जंक्शनवरून एल.जे. रोडमार्गे वळवण्यात आली आहेत.
दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वाहनधारकांनी कलानगर जंक्शनवरून धारावी टी-जंक्शनमार्गे सायनकडे किंवा वांद्रे-वरळी सी लिंकचा वापर करावा. उत्तर मुंबईत जाणाऱ्या वाहन धारकांनी पी. डी’मेलो रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्ग किंवा सी लिंकचा वापर करावा. तसेच महालक्ष्मी स्टेशनकडून येणाऱ्या वाहनांनी सेनापती बापट मार्गाचा वापर करावा, असा सल्ला यात देण्यात आल्या आहेत.
वडाळा ब्रीज, बरकत अली नाका आणि इस्टर्न फ्रीवेचा वापर करून दक्षिण मुंबईत जाता येईल. वीर सावरकर रोड, रानडे रोड आणि केळुस्कर रोडवर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. कोहिनूर स्क्वेअर, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, कामगार स्टेडियम आणि फाईव्ह गार्डन येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.