कल्याण जवळील रायते पुलावर इको गाडीचा भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ग्रामीण भागातील रायते पुलावर इको गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी हा अपघात घडला असून यामध्ये अकरा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते आहे. सर्वांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत असून अद्याप कुणाची ओळख पटली नाही, असे सांगण्यात आले आहे.
रायते पुलावर सिमेंट मिक्सर आणि इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये इको कारमधील 12 प्रवाशांपैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पाच जणांच्या इको सीटर गाडीत 12 जण कोंबून भरून गाडी सुसाट मुरबाडच्या दिशेने चालली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही काळी-पिवळी इको कार कल्याण ते मुरूड अशी प्रवासी वाहतूक करत होती. रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला या कारची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम केले.
Comments are closed.