Ratnagiri News – दापोलीच्या कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीकडून मानांकन प्रक्रियेत ‘अ’ दर्जा प्राप्त
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ या कोकणातील अग्रगण्य कृषि शिक्षण संस्थेला भारतीय कृषि अनुसंधान परिषद ICAR कडून मानांकन प्रक्रियेत ‘A’ ग्रेड प्राप्त झाली आहे. सदरचे मानांकन २०२५ ते २०२९ या पाच वर्ष कालावधीसाठी देण्यात आले आहे. या यशामुळे विद्यापीठाच्या शैक्षणीक, संशोधन व विस्तार कार्याची गुणवता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
ICAR च्या मानांकन प्रक्रियेदरम्यान अध्यापन पध्दती, संशोधनातील गुणवत्ता, आधुनिक सुविधा, तसेच शेतक-यांपर्यंत पोहोचणारे विस्तारकार्य या सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या सर्व निकषांमध्ये विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी करत ‘A’ ग्रेड पटकावली आहे. विद्यापीठाने गेल्या काही वर्षात कोकणातील शेतीला पूरक संशोधन, स्थानिक पिकांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शेतकऱ्यांशी सातत्याने ठेवलेला संवाद यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात विद्यापीठ आघाडीवर राहिले आहे. या मानांकनामुळे विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक भक्कम झाली असून भविष्यात संशोधन व शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
Comments are closed.