8 राज्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई

सीबीआयचे 77 ठिकाणी छापे : बिल्डर्स-वित्तीय संस्थांमधील साटंलोटं प्रकरणी अॅक्शन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीबीआयने देशातील 8 राज्यांच्या 77 ठिकाणांवर मंगळवारी छापे टाकले आहेत. ही मोठी कारवाई काही बिल्डर्स आणि वित्तीय संस्थांमधील संगनमत प्रकरणी करण्यात आली आहे. अनेक बिल्डर्स आणि वित्तीय संस्थांनी मिळून घर खरेदीदारांच्या भांडवलातून फेरफार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने 22 गुन्ह नोंदविले आणि कारवाई सुरू केली.

सीबीआयने दिल्ली, बेंगळूर, चेन्नई, पु•gचेरी येथे देखील ही कारवाई केली आहे. हे प्रकरण सुपरटेक लिमिटेड समवेत अनेक बिल्डर्सशी निगडित आहे.  या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सोपविली होती.

याप्रकरणी एनसीआरच्या आरोपी बिल्डर्स विरोधात गुन्हा नोंद करत चौकशी सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 29 एप्रिल 2025 रोजी सीबीआयला दिला होता. घरखरेदीदारांची फसवणूक झालेल्या 22 प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद करण्याचा आदेश सीबीआयला देण्यात आला होता. यानंतर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने सीबीआयला आणखी 6 गुन्हे नोंदविण्याचा निर्देश दिला होता. बिल्डर्स आणि बँकांमधील साटलोट्याप्रकरणी हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. बँका आणि बिल्डर्सनी मिळून फसवणूक केल्याची तक्रार होती.

संबंधित बिल्डर्सचे प्रकल्प दिल्ली-एनसीआर, मोहाली, मुंबई, बेंगळूर, कोलकाता आणि प्रयागराज येथे होते. छाप्यांदरम्यान सीबीआयने काही दस्तऐवज ताब्यात घेतले असून ते पुरावा ठरू शकतात. याचबरोबर काही डिजिटल उपकरणे देखील सीबीआयने जप्त केली आहेत. बँका आणि बिल्डर्सच्या नेक्ससचा छडा लावण्यासाठी छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयचे सांगणे आहे. याच नेक्सस अंतर्गत मोठ्या प्रमाणात लोकांनी गुंतवलेल्या रकमेचा गैरवापर करण्यात आला आहे. फसवणूक होऊनही अनेक लोक आजही स्वत:च्या घरांचे हप्ते भरत आहेत तरीही त्यांना त्याचा ताबा मिळालेला नाही.

Comments are closed.