ट्रम्प यांची पुन्हा माघार होर्मुझची नाकेबंदी उठवली, इराणशी चर्चेचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणला रोजच्या रोज धमक्या देणारे आणि नवनव्या व्यूहरचना करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा माघार घेतली. जागतिक दबाव आणि इराणच्या प्रत्युत्तराच्या इशाऱ्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी उठवण्याची घोषणा केली. पुन्हा अशी नाकेबंदी केली जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.

तब्बल 40 दिवसांच्या युद्धानंतरही इराणला नमवू न शकलेल्या अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराणच्या अटींवर युद्धविराम जाहीर केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चाही झाली. मात्र ती चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी इराणला जगापासून तोडण्याचा निर्णय जाहीर केला. इराणच्या बंदरावर एकही जहाज जाऊ देणार नाही, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. नौदलाच्या अनेक तुकडय़ा उतरवून नाकेबंदी सुरूही केली. इराणनेही या नाकेबंदीला उत्तर देण्याच्या हालचाली सुरू केल्या. आखातातील एकही बंदर सुरक्षित ठेवणार नाही, अशी धमकीच इराणने दिली. त्यामुळे आखाती देशांबरोबर युरोपीय देशांचेही धाबे दणाणले. सौदी, यूएई या देशांनी ही नाकेबंदी मागे घेण्यासाठी अमेरिकेकडे तगादा लावला. त्याचा परिणाम होऊन अवघ्या 24 तासांत ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली.

अपयश लपवण्यासाठी चीनचा आधार

होर्मुझचे अपयश लपवण्यासाठी ट्रम्प यांनी चीनचा आधार घेतला. इराणला शस्त्रास्त्रs पुरवणार नसल्याचे आश्वासन चीनने दिले आहे. त्यामुळे मी चीनसह संपूर्ण जगासाठी होर्मुझचा वेढा उठवत आहे, असे ट्रम्प यांनी आज सांगितले. लवकरच मी चीन दौऱ्यावर जाणार आहे. एकमेकांशी लढण्यापेक्षा एकत्र काम करणे केव्हाही चांगले आहे. पण वेळ आली तर लढण्यातही आम्ही अत्यंत पटाईत आहोत, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.

पाकिस्तानी शिष्टमंडळ इराणमध्ये पोहोचले!

अमेरिका व इराणमध्ये थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज इराणमध्ये पोहोचले. या शिष्टमंडळाची इराणी नेत्यांशी बैठक होणार असून त्यात पुढील चर्चेची वेळ निश्चित होईल.

Comments are closed.