घाऊक महागाई दरात लक्षणीय वाढ
मार्चमध्ये दर 3.88 टक्के : इंधन तेल, गॅसदरातील वृद्धीचा मोठा परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मार्च महिन्यात घाऊक महागाई दरात लक्षणीय वाढ पहावयास मिळाली आहे. या महिन्यात घाऊक महागाईवाढीचा दर 3.88 टक्के इतका आहे. फेब्रुवारीत तो केवळ 2.13 टक्के होता. त्या तुलनेत मार्चमध्ये महागाई अधिक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली कच्च्या इंधन तेलाच्या दरातील वाढ, विमानाचे इंधन आणि व्यापारी उपयोगाच्या इंधन वायूच्या दरात झालेली मोठी वाढ इत्यादी कारणांमुळे मार्च महिन्यात महागाई दरात अधिक वाढ झाली, असे स्पष्ट केले गेले.
मार्चमध्ये जवळपास सर्वच क्षेत्रांना महागाईचा फटका बसल्याचे दिसत आहे. इंधन तेल आणि वायू प्रमाणेच प्राथमिक वस्तू. उत्पादित वस्तू, नैसर्गिक वायू, उत्पादित पायाभूत धातू, अन्न आणि बिगर अन्न वस्तू, तयार अन्नपदार्थ अशा सर्वच वस्तूंचे दर वाढले असल्याची माहिती केंद्रीय सांख्यिकी विभागाने दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्थिती कारणीभूत
संपूर्ण मार्च महिन्यात मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध झाले. ते अद्यापही मिटलेले नसल्यामुळे इंधन तेल आणि गॅस यांच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला. तो आजही येत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर अजूनपर्यंत तरी वाढलेले नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. हंगामी महागाई वाढही याचवेळी झाल्याने घाऊक महागाई दरात भरच पडल्याची माहिती देण्यात आली. युद्ध लवकर थांबले नाही आणि परिस्थिती वेगाने पूर्ववत झाली नाही, तर आणखी महागाई वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाची दिलासादायक बाब म्हणजे महागाई दरात वाढ झाली असली, तरी जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झालेली नाही. इतर अनेक देशांमध्ये, विशेषत: आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांमध्येही पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या तुलनेत भारतातील स्थिती अद्याप तरी चांगली आहे, असेही मत काही तज्ञांनी या संदर्भात व्यक्त केले.
विविध क्षेत्रे आणि महागाई वाढ
क्षेत्र मार्चमधील घाऊक वाढ
प्राधान्यक्रम वस्तू 6.36 टक्के (मासिक वाढ 2.28 टक्के)
इंधन आणि वीज 1.05 टक्के (मागील महिन्यांमध्ये नकारात्मक)
उत्पादित वस्तू 3.39 टक्के (22 पैकी 16 गटांमध्ये दरवाढ)
सर्व वस्तूंची सरासरी 1.64 टक्के (फेब्रुवारीत 0.38 टक्के दरवाढ)
Comments are closed.