अंदमान समुद्रात 250 प्रवाशांना घेऊन निघालेली बोट उलटली, मलेशियाला जाताना झाला अपघात, बेपत्ता नागरिकांचा युद्धपातळीवर शोध सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांना घेऊन मलेशियाच्या दिशेने निघालेल्या बोटीचा अपघात झाला. खराब हवामान आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांमुळे हा अपघात होऊन बोट अंदमान समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित (UNHCR) आणि स्थलांतरण संस्थांनी (IOM) प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनानुसार या बोटीत अंदाजे 250 नागरिक बेकायदेशीरपणे प्रवास करत होते. खोल समुद्रात ही बोट उलटल्याने काही जणांचा बुडून मृत्यू झाला असून अनेक जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि स्थलांतरण संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या कॉक्स बाजार जिह्यातील टेकनाफ येथून या बोटीचा प्रवास सुरू झाला. मात्र जोरदार वारे, खराब हवामान आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांमुळे बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती समुद्रात उलटली. UNHCR आणि IOM यांनी घटनेबद्दल खेद व्यक्त करत प्रादेशिक सरकारांना शोध आणि बचावकार्याला गती देण्याचे आवाहन केले आहे. या बेपत्ता प्रवाशांबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. समुद्रात सध्या बचाव मोहीम राबवली जात असली तरी बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. या घटनेत मृतकांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मानवी तस्करांकडून नोकरीचे आमिष

बांगलादेश तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या दिशेने जात असलेल्या ‘एम.टी. मेघना प्राईड’ नावाच्या जहाजातील कर्मचाऱयांनी 9 एप्रिलला अंदमान बेटाजवळ पाण्याचा ड्रम आणि लाकडांच्या मदतीने पाण्यावर तरंगणाऱया नऊ जणांचा जीव वाचवला होता. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत बचावलेल्या 40 वर्षीय रफिकुल इस्लाम याने सांगितले की, मलेशियात नोकरी देण्याचे आमिष दाखवून मानवी तस्करांनी त्यांना जहाजात बसवले होते. गस्ती पथकांपासून बचावासाठी तस्करांनी सर्वांना बोटीवरील लहानशा जागेत लपायला भाग पाडले होते. तिथे 30 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. दुर्घटने वेळी बोटीत जवळपास 240 जण होते. यात 20 महिला आणि लहान मुले होती.

Comments are closed.